16 हजार लाभार्थी ठरले अपात्र : प्रधानमंत्री आवास योजनेच्या ‘ड’ यादीला ऑनलाईन मंजुरीप्राप्त : गरजू वंचित लाभार्थ्यांबाबत सकारात्मक कार्यवाहीची गरज
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर यादींमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या संपत आल्याने तसेच घरकुलांची अत्यंत आवश्यकता असलेले लाभार्थी गेले काही महिने ‘ड’ यादीच्या प्रतिक्षेत होते. या ‘ड’ यादीला ऑनलाईन मान्यता मिळाली आहे. यात जिल्हय़ातून पाठविण्यात आलेल्या 36 हजार 729 लाभार्थ्यांपैकी 20 हजार 619 घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याचे समजते. मात्र, असे असले तरिही अजूनही खरोखरच घरकुलांची गरज असलेल्या निराधार व्यक्तींपैकी काहींची नावे या यादीत नसल्याचे समजते. त्यामुळे यासाठी तातडीने सर्व्हे होऊन गावागावात अशा शिल्लक लाभार्थ्यांबाबत सकारात्मक निर्णयाची गरज आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शेकडो घरांची कामे झाली. अजूनही काही लाभार्थी आहेत. मात्र, असे असले तरिही काही गरजू लाभार्थी ‘ड’ यादीतील सर्व्हेत असल्याने त्यांना लाभ मिळण्यासाठी ही यादी मंजुरीची प्रतिक्षा गेले अनेक महिने होते. कणकवलीचे सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर यांनी यादी तातडीने मंजूर व्हावी, यासाठी सातत्याने पत्रव्यवहार करत पाठपुरावाही केला होता.
उपलब्ध माहितीनुसार, आता ‘ड’ यादीला ऑनलाईन मंजुरी मिळाली आहे. या मंजूर यादीत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 20 हजार 619 लाभार्थी पात्र ठरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील आठही तालुक्यांतील मिळून 36 हजार 729 लाभार्थ्यांची ‘ड’ यादी मंजुरीसाठी पाठविण्यात आलेली होती. या यादीतील नावे आधार लिंकिंगशी जोडून पडताळणी करण्यात आल्याचे समजते. त्यानुसार 16 हजार 110 लाभार्थी अपात्र ठरल्याचे दिसून येते. हे लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात बसत नसल्याने अपात्र ठरविण्यात आले आहेत.
मात्र, असे असले तरिही या व्यतिरिक्त सर्व्हेवेळी बेघर असलेल्यांपैकी काही लाभार्थी अद्यापही वंचित आहेत. कासार्डे येथील सामाजिक कार्यकर्ते संजय नकाशे म्हणाले, येथे चंद्रभागा कोकाटे या महिलेचे नाव या यादीत येणे आवश्यक होते. सर्व्हेत तिचे नाव होते. तिचे घर मोडकळीला आलेले आहे. तिच्याकडे दुसरे साधनही नाही. सभापती, गटविकास अधिकाऱयांनी पाहणीही केली होती. मात्र, मंजूर यादीत तिचे नाव नसल्याचे ते म्हणाले. यासाठी गावागावात असे लाभार्थी असल्यास, ज्यांना खरोखरच घरकुलांची गरज आहे, अशांचा सर्व्हे होऊन त्यांना तातडीने यादीत समाविष्ट करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. कारण आजही घरे असलेल्या अनेकांना घरकुलांचा लाभ मिळाला. मात्र, खरोखरच ज्यांना गरज आहे, जे निराधार आहेत, असे अनेकजण घरकुलांपासून वंचित राहत असतील तर ही योजना फलदायी ठरली, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही.
या साऱयाचा विचार करून प्रशासकीय पातळीवर गावागावात असे लाभार्थी शिल्लक असल्यास त्यांबाबत आवश्यक कार्यवाही, ग्रापंचायत ठराव घेऊन त्यांची नावे या याद्यांमध्ये कशी समाविष्ट होतील व त्यांना घरकुलाचा लाभ कसा देता येईल, याचा सकारात्मकदृष्टीने विचार होण्याची गरज आहे.
तालुकानिहाय ‘ड’ यादीसाठी पाठविलेले व मंजूर लाभार्थी
तालुका रजिस्टेशन झालेले लाभार्थी पात्र लाभार्थी
मालवण 3353 1617
देवगड 3623 2430
वैभववाडी 1589 1128
सावंतवाडी 6781 3460
दोडामार्ग 2951 1558
कुडाळ 9810 5450
कणकवली 4368 3177
वेंगुर्ले 4254 1799









