जिल्हाधिकारी ड़ॉ बी.एन. पाटील यांचे आदेश
प्रतिनिधी/ रत्नािगरी
जिह्यातील हॉटेल आता रात्री 12 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या बाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी नुकतेच जारी केले आहेत़
यापूर्वी 1 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशामध्ये सर्व स्तरावर कोविड निर्बंधातून शिथिलता देण्यात आली होती. मात्र रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते. प्रशासनाच्या या निर्णयाबाबत हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती.
या बाबत रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनने 4 फेब्रुवारी रोजी एक लेखी निवेदन देखील दिले होते. नव्याने सुरु होणारी पर्यटनस्थळे, शाळा, व्यापार यांचा विचार करता हॉटेलसाठी रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ गैरसोयीची आहे. याचा फटका हॉटेल व्यवसायाला बसत असल्याचे निवेदन हॉटेल असोसिएशनकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. हॉटेल व्यावसायिकांची ही अडचण ओळखून बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी नवीन आदेश काढले असून याद्वारे रत्नागिरी जिह्यातील सर्व रेस्टॉरंट व उपहारगृह दररोज रात्री 12 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.









