प्रा. नितीन बानुगडे-पाटील
प्रतिनिधी/ सातारा
सध्या सुरु असलेल्या सर्व राजकीय घडामोडीत संपूर्ण सातारा जिह्यातील शिवसैनिक व पदाधिकारी हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. शिवसेनेला ही संकटे नवी नाहीत. अशी अनेक संकटे शिवसेनेवर या आधीही आलेली आहेत. परंतु शिवसेना त्याच्यातून मोठय़ा ताकतीने उभी राहिली आहे व विस्तारली आहे, असे मत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.
विश्राम गृह येथे सातारा जिल्हा मधील शिवसेना सभासद नोंदणी अभियानाला प्रा. नितीन बानुगडे – पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी .जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, महाबळेश्र्वर संपर्क प्रमुख संदीप भोज, तालुका प्रमुख अनिल गुजर, रमेश सावंत, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, शिवराज टोणपे, सातारा शहर संघटक प्रणव सावंत, शहर संघटीका रुपा लेंभे, उपतालुकाप्रमुख प्रशांत शेळके, उपशहर प्रमुख अमोल गोसावी, सागर धोत्रे, गणेश अहिवळें, सुमित नाईक, सादिक शेख, रवी भणगे, इम्रान बागवान, हरिभाऊ पवार, लक्ष्मण जाधव, राहुल गुजर, युवा सेना तालुका अधिकारी महेश शिर्के, नितेश गादे, गोरख राठोड आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, शिवसेना ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आहे. रस्त्यावरची लढाई लढणाऱया मावळय़ांची आहे. शिवसेनेने अनेक लाटा पाहिल्या आहेत. त्या लाटांना धैर्याने सामोरे गेली आहे. शिवसेना वाढत राहिली आहे. आताही आलेली ही संकटरुपी लाट निघून जाईल. शिवसेना मात्र वेगाने पुढे जाईल. जिह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी शिवसेना प्रमुख उद्धवसाहेबांच्या पाठीशी आहेत. जास्तीत जास्त सभासद नोंदणी जिह्यातून करुयात, असे आवाहन त्यांनी केले.








