उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र याबाबतचा निर्णय त्या-त्या जिह्यातील परिस्थिती पाहून घेतला जाईल. याबाबत जिल्हाधिकारी आपला अहवाल आपत्ती व्यवस्थापन विभागाला देतील. त्यानंतर टास्क फोर्स याबाबतचा निर्णय घेईल, असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
रत्नागिरीनजीकच्या हातखंबा येथे तरुणांच्या कोरोना लसीकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी महाविद्यालये सुरू होण्यासह मुंबई महानगरपालिकेविषयीही भाष्य केले. शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे. चार काय, चाळीस नवीन मंत्री झाले तरी शिवसेनेला कोणीही रोखू शकत नाही. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, अशी प्रतिक्रियाही सामंत यांनी दिली. जिल्हा नियोजन समितीची बैठक 24 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे आणि याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हा दौऱयावर आहेत. त्यामुळे राणेंना शह देण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चेबांधणी असल्याचेही चर्चिले जात आहे. मात्र बैठक आणि राणेंचा दौरा हा केवळ योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.
बैलगाडी शर्यतीसाठी केंद्राकडे मागणी करावी
सध्या बैलगाडी शर्यतीसंदर्भात आंदोलनाचा विषय ऐरणीवर आहे. सांगली येथील बैलगाडी शर्यत आंदोलनाची बातमी चर्चेत आहे. बैलगाडी शर्यतीसंदर्भात आंदोलन करणाऱयांनी केंद्राकडेही याबाबतची मागणी करावी. केंद्रात त्यांचे सरकार आहे. केंद्र सरकारनेही याबाबत निर्णय घेतला पाहिजे. महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे म्हणून काहींकडून असे प्रकार होत असल्याची टीका सामंत यांनी पडळकर यांचे नाव न घेता केली.









