हातखंबा परिसरात वेगाने फैलाव
प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील हातखंबा, खेडशी, पानवल, भोके परिसरात पाळीव गुरांमध्ये ‘लॅम्पी स्कीन’ या प्राणघातक रोगाचा वेगाने फैलाव होत असल्याचे पुढे येत आहे. जिह्यातील विविध भागात याचा संसर्ग आढळून आल्याचे सांगितले जात आहे. प्रयोगशालेय तपासणीनंतरच या रोगाची खात्री होणार असली तरीही जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून हातखंबा व खेडशी येथे काही शेतकऱयांच्या गुरांना अज्ञात रोगाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे तेथील शेतकरी बांधव चिंताग्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. प्राण्यांच्या त्वचेवर पुरळ व मोठ-मोठे फोड उठत असून वेळीच उपचार न झाल्यास हे फोड फुटून त्यातून लस वाहू लागते व जनावरांची अवस्था गंभीर होते. या रोगाचा फैलावही वेगाने होत असल्याने पशुपालक शेतकरी संभ्रमात आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या बाबत अनेक अफवाही पसरत असल्याने या चिंतेत वाढ होत आहे.
हातखंबा परिसरातील एका शेतकऱयाची गाय या रोगाने मृत्यूमुखी पडली. या गाईच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या लोकांच्या गोठय़ातील जनावरांनाही काही दिवसानी या रोगाची लागण झाली. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बाबत तेथील शेतकऱयांनी पशुविभागाशी संपर्क साधला असता तातडीने विविध अधिकाऱयांनी या जनावरांची तपासणी करून पुढील कार्यवाही सुरु केली आहे. शनिवारी हातखंबा परिसरातील गुरांसाठी लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतला आहे एकाच दिवशी हातखंबा येथील काही वाडय़ांमध्ये हे लसीकरण होणार आहे. शुक्रवारी पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी हातखंबा येथे भेट देऊन बाधीत जनावरांची तपासणी केली. या जनावरांचे अलगीकरण करावे, त्यांना कोथिंबीर व गूळ अशी टॉनिके द्यावीत, असे सूचवले.
‘लम्पी स्कीन डिसीज’ हा चर्मरोग असून हा साथीचा आजार पाळीव प्राण्यांमध्ये आढळून येतो. या आजाराचा प्रसार मुख्यत्वे चावणाऱया माशा, डास, गोचीड, चिलटे यांच्यामार्फत होत असल्याचे पशुतज्ञांचे म्हणणे आहे. तसेच जनावराची लाळ, डोळ्यातील पाणी, नाकातील श्राव पाण्यात मिसळून किंवा त्वचेवरील फोडांच्या खपल्यांद्वारेही याचा प्रसार शक्य आहे.









