प्रतिनिधी / रत्नागिरी :
जिह्यात प्रशासनाकडून जारी अटी व शर्तीच्या अधीन राहून गणेशोत्सव व ईद सण साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या चार महिन्यातील आरोग्य सेवेचा आढावा घेतानाच ‘निसर्ग’ग्रस्तांना मदत व तीवरे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या सद्यस्थितीबाबतही माहिती दिली.
शासन व मंदिरातील प्रमुखांमध्ये समन्वय साधता यावा यासाठी जिल्हास्तरावर पाच जणांची समिती स्थापन करण्यात येत आहे. ज्याप्रमाणे रमजान ईद शासकीय सूचनांचे पालन करत साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे बकरी ईद साजरी करताना शासनाकडून जारी अटी-शर्ताचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन संबंधितानी दिल्याचे त्यांनी सांगितले. आगामी गणेशोत्सव व ईद या प्रमुख सणांसह सर्वच धार्मिक उत्सव शासनाच्या नियमांच्या चौकटीतच साजरे करणे सर्वांच्या हिताचे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. यासाठी कोकणवासियांचे चांगले सहकार्य निळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्लाझ्मा थेरपीसाठी प्रशिक्षण पूर्ण झाले असून आवश्यक यंत्रसामुग्रीही लवकरच उपलब्ध होणार आहे. जिह्यात 600 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून बऱया झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा वापरून कोरोना रुग्णांना बरे करणे शक्य आहे. त्यामुळे बऱया झालेल्या रुग्णाने यासाठी पुढे यावे, असे आवाहन करतानाच वैयक्तिक भेट देऊन याबाबत कौन्सिलिंग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
आर्सेनिक अल्बम गोळ्यांचा दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी आवश्यक औषध वाटप करण्याचे निर्देश आरोग्य अधिकाऱयाना देण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना पावसाळ्यामध्ये आरोग्य सर्वेक्षण करताना रेनकोटची गरज आहे. नियोजन निधीतून अथवा कोविडच्या निधीतून त्यांच्यासाठी रेनपोट खरेदी करून त्वरित वाटप करण्याच्या सूचना आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
गेल्या चार महिन्यात कोव्हीड – 19 बरोबर लढतानाच इतर रोगांबाबत आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या कामगिरीची माहिती त्यांनी यावेळी दिली. या चार महिन्यात शासकीय रुग्णालयात 1 लाख 33 हजार 465 रुग्णांना ओपीडीमध्ये तर 12 हजार 333 जणांना आयपीडीमध्ये तपासण्यात आले. याच दरम्यान 600 रुग्णांवर मोठया शस्त्रक्रिया तर 153 रुग्णांवर किरकोळ स्वरुपाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून एप्रिल महिन्यामध्ये 58 हजार 822 तर मे महिन्यात 75 हजार 232 जणांना ओपीडीमध्ये तपासण्यात आल्याचे ते म्हणाले.
तिवरे धरण पुनर्वसनासंदर्भात माहिती देताना सामंत म्हणाले की 5 कोटी रुपये श्री सिध्दीविनायक ट्रस्टकडून आधीच प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील 26 घरांसाठी निविदाही निघाली आहे. उर्वरित 6 कोटी रुपयाची हमी सिध्दीविनायक ट्रस्टने दिल्याचे ते म्हणाले. निसर्ग चक्रीवादळासाठी 116 कोटी रुपयाची निधी प्राप्त झाला असून यापैकी 59 टक्के निधीचे वाटप करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी या पत्रकार परिषदेत दिली.









