ज़ि प च्या 2 हजार 354 शाळा, तर खासगी 322 शाळांचा समावेश
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोविडच्या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यास सुरवात केली आहे. भौगोलिकदृष्टय़ा अडचणीच्या गावात मोबाईलला नेटवर्क नसले तरीही नसली शिक्षणात खंड पडलेला नाही. रत्नागिरी जिह्यात जिल्हा परिषदेच्या 2,930 शाळा आहेत. त्यातील 2,676 शाळात ऑनलाईन शिक्षण सुरु असून 255 शाळातील विद्यार्थ्यांना गृहभेटीतून शिकवले जात आहे.
रत्नागिरी जिह्यात सुमारे 75 हजार विद्यार्थी असून सहा हजार शिक्षक आहेत. बहूतांश शिक्षकांनी कोरोना कालावधीतही शिक्षणाचे कामकाज न थांबवता विविध पर्यायांचा उपयोग करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. त्यात ऑनलाईन अभ्यासक्रमाची कास धरली. दिक्षा ऍपवरील अभ्यासक्रमाचे व्हीडीओ विद्यार्थ्यांना मोबाईलवर व्हॉटस्ऍपद्वारे पाठवले जातात. ज्यांच्याकडे ऍड्रॉईड मोबाईल नाहीत, पण साधे मोबाईल आहेत त्यांच्याशी शिक्षक संवाद साधतात. सराव प्रश्नपत्रिका तयार करुन त्या व्हॉटस्ऍपवरुन सोडवून घेण्यात येतात. त्याचे मुल्यमापन करुन त्रुटी सोडवल्या जात आहेत. व्हॉटस्ऍप नसलेल्या आणि कोरोना प्रादुर्भाव नाही गावात स्वतः शिक्षक प्रश्नपत्रिका पोच करत आहेत.
ऑनलाईन शिक्षण सुरु असलेल्या 2,676 शाळांपैकी 2,354 शाळा जिल्हा परिषदेच्या तर 322 खासगी शाळा आहेत. ऑनलाईन सुविधा नसलेल्या 207 जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. रत्नागिरी तालुक्यात 317 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 825 शिक्षक कार्यरत आहेत. कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आणि शिक्षणात खंड पडला. तालुक्यात सुमारे 18 हजार विद्यार्थी आहेत. ऑनलाईनचा वापर न करणारे 50 टक्के तर साधे मोबाईल असलेले 20 टक्के विद्यार्थी आहेत. 30 टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण गृहभेटीतूनच सुरु आहे. रत्नागिरी तालुक्यात रेंज नसलेले कळझोंडी, आगरनरळ, गडनरळ, डोर्ले, कुर्धे, गणेशगुळे गावातील काही भाग आहेत. जिथे मोबाईलला रेंजच नाही. तिथे गृहभेटीचा पर्याय शिक्षकांनी अवलंबला आहे.









