स्वत:ला समजू लागली जलपरी
फॅशन शोमध्ये तुम्ही स्टायलिश डिझाइनर आउटफिटचे प्रदर्शन पाहिले असेल. जगभरात आयोजित होणाऱ्या अशाप्रकारच्या शोमध्ये डिझाइनर अनेकदा काहीतरी नवे सादर करत असतात. अनेकदा फॅशन शोमध्ये केले जाणारे प्रयोग मनमोहक असतात. मागील वर्षी फ्रेंच ब्रँड कंपनीने बेला हदीदच्या एका पोशाखावर स्प्रे-पेंटिंग करून फॅशन उद्योगाला स्मरणीय क्षण मिळवून दिला होता. आता चेन्नईतील एका मॉडेलनेही काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.
चेन्नईतील एका फॅशन शोमध्ये मॉडेल जिवंत मासा ड्रेसमध्ये ठेवून रॅम्पवॉक करताना दिसून आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यात एक मॉडेल जलपरीच्या पद्धतीने पोशाख परिधान करून असल्याचे दिसून येते. या पोशाखातच एक फिशपॉन्डसारखे भांडे तयार करण्यात आले असून त्यात छोटे मासे ठेवण्यात आले होते. या माशांसोबत मॉडेलने रॅम्पवॉक केला आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काहीतरी वेगळे करण्याच्या नादात प्राण्यांचा वापर होत असल्याने काही युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडिओला 4 लाखाहून अधिक लाइक्स आणि हजारो कॉमेंट्स प्राप्त झाल्या आहेत.









