14 लाख जनावरांना टॅगिंग, जनावरांची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
प्रतिनिधी /बेळगाव
पशुधनाची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याबरोबर केंद्र सरकारच्या पशु संजीवनी योजनेंतर्गत जनावरांच्या कानांना बारा अंकी (नंबर) टॅग लावला जात आहे. आधारकार्डच्या धर्तीवर दुधाळ जनावरांची युनिक आयडी अर्थात विशिष्ट ओळख क्रमांक दिला जात आहे. दरम्यान जनावरांची संपूर्ण माहिती संगणक प्रणालीमध्ये भरली जात आहे. त्यामुळे आता एका क्लिकवर जनावरांची संपूर्ण माहिती उपलब्ध होत आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 14 लाख जनावरांचे म्हणजेच 90 टक्के टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पशु संगोपनने दिली आहे.
देशभरात जनावरांची ओळख पटवून देण्यासाठी टॅगिंगची निरंतर सेवा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात केवळ दुधाळ जनावरांना टॅग लावले जात होते. मात्र आता गाई-म्हशींबरोबर शेळय़ा-मेंढय़ांना देखील टॅग लावले जात आहेत. दरम्यान जनावरांची उंची, वय, आहार आणि प्रजननाबाबत संपूर्ण माहिती ऑनलाईन अपलोड केली जात आहे.
या टॅगमुळे जनावरांची एकूण संख्या समजणार आहे. शिवाय एखादे जनावर चोरीस गेल्यास त्याचा मूळ मालक शोधण्यास मदत होणार आहे. या आधारकार्डच्या माध्यमातून प्रत्येक गाई-म्हशीसाठी एक ओळख क्रमांक दिला जात आहे. त्यामुळे रोग प्रतिबंधक लस, औषधे आणि कृत्रिम रेतन याबाबतचा साठा करण्यासाठी खात्याला सोयीस्कर ठरणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती दरम्यान टॅगिंग झालेल्या जनावराचा मृत्यू झाल्यास शासकीय नुकसान भरपाई मिळण्यास मदत होणार आहे. याबरोबर जनावरांच्या विक्रीसाठी आधारकार्ड महत्वाचे ठरणार आहे.
जिल्हय़ातील सर्व जनावरांना टॅग लावले जात आहेत. आतापर्यंत 90 टक्के टॅगिंगचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित जनावरांना देखील टॅग लावले जातील. इतर लसीकरणामुळे या कामाला अडचणी येत आहेत. मात्र टॅगिंगचे काम निरंतर सुरू आहे. त्यामुळे घरबसल्या मोबाईलवर एकूण जनावरांची माहिती उपलब्ध होणार आहे.
– ए. के. चंद्रशेखर (उपनिर्देशक पशु संगोपन खाते बेळगाव)









