बेळगाव / प्रतिनिधी
कोरोनावरील लसीकरणाची रंगीत तालीम शुक्रवारी जिल्हय़ात 7 ठिकाणी सुरळीतपणे पार पडली. या लसीकरणाच्या रंगीत तालीममध्ये प्रत्येक ठिकाणी 25 लाभार्थींना सहभागी करून घेण्यात आले होते.
बेळगावचे बिम्स हॉस्पिटल, केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल, लेक व्हय़ू हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र अथणी, समुदाय भवन एकसंबा, नगर आरोग्य केंद्र निपाणी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कोन्नुर या ठिकाणी ही रंगीत तालीम पार पडली. केंद्रावर लस उपलब्ध झाल्यापासून ती रुग्णाला देण्यापर्यंत एकूण किती कालावधी लागतो याचा अंदाज घेणे हे या रंगीत तालमीचे प्रमुख वैशिष्टय़ होते.
जिल्हा आरोग्य खात्याचे डॉ. ईश्वर गडाद यांनी दिलेल्या माहितीनुसार लाभार्थीचा संगणकातील तपशील तपासून पाहणे आणि लस देण्यासाठी 5 ते 8 मिनिटांचा कालावधी लागला. मात्र लस दिल्यानंतर रुग्णाला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवावे लागते. त्यामुळे एकूण प्रक्रियेसाठी 40 मिनिटांचा कालावधी लागतो, असा निष्कर्ष पुढे आला. जिल्हय़ातील सातही ठिकाणी प्रत्येकी अडीच तासांमध्ये रंगीत तालीम पूर्ण झाली. डॉ. गडाद यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ तसेच डॉ. प्रविण स्वामी, सिद्राम एम. एच. व नावीद हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना लसीकरणाची ही रंगीत तालीम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.









