आणखी सहाजणांचे रिपोर्ट निगेटिव्ह : आठ नमुने तपासणीसाठी मिरजला
- आयसोलेशन वॉर्डमध्ये तीन नवीन रुग्ण दाखल
- 106 व्यक्ती झाल्या होमक्वारंटाईन मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी सहा नमुन्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तर आणखी आठ नमुन्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी तीन रुग्णांना दाखल करण्यात आले असून एकूण 29 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हय़ात आतापर्यंत 452 व्यक्ती विलगीकरणात असून त्यापैकी 380 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये 72 व्यक्ती असून 106 व्यक्तींना होमक्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी तीन रुग्ण वाढल्यामुळे 29 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी सहाजणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत एकूण 82 नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी 74 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये 73 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एका रुग्णाचाच रिपोर्ट फक्त पॉझिटिव्ह अहवाल आला होता. आता त्याही रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने त्या रुग्णाला डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर आठ नमुन्यांचा अहवाल अजून प्राप्त झाला नसल्याने या अहवालांची प्रतीक्षा आहे.
आरोग्य यंत्रणेमार्फत आज 1795 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून जिल्हय़ामध्ये ताप व खोकल्याच्या रुग्णांचे सक्रीय सर्वेक्षण सुरू आहे. जिल्हय़ातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना नियमित मिळणाऱया 35 किलो धान्याव्यतिरिक्त पाच किलो प्रति व्यक्ती धान्य मोफत देण्यात येत आहे. तसेच केशरी शिधापत्रिकाधारकांना प्रती व्यक्ती तीन किलो गहू आठ रुपये प्रति किलो दराने आणि दोन किलो तांदूळ 12 रुपये दराने मिळणार आहेत.
जिल्हय़ातील स्थलांतरित, बेघर, मजूर व कामगारांसाठीच्या कॅम्पमध्ये असलेल्यांची प्रशासनातर्फे योग्य ती काळजी घेण्यात येत असून त्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जेवण व नाष्टय़ा व्यतिरिक्त त्यांना लागणाऱया वस्तू जसे टुथपेस्ट, साबण यांचाही पुरवठा करण्यात येत आहे.
घरीच अलगीकरण 380
संस्थात्मक अलगीकरण 072
पाठविलेले एकूण नमुने 082
अहवाल प्राप्त नमुने 074
पॉझिटिव्ह आलेले नमुने 001
निगेटिव्ह आलेले नमुने 073
अलवाल न मिळालेले नमुने 008
विलगीकरण कक्षात दाखल 029
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 000
शनिवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 1795









