मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यामध्ये 1 लाख 66 हजाराहून अधिक घरगुती गणेशोत्सव तसेच 114 सार्वजनिक गणेशोत्सव हे कोविडचे नियम पाळून साजरे करण्यात येणार आहेत. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 1 सप्टेंबरपासून 100 टक्के जिह्यातील एसटी बस वाहतूक सेवा सुरु होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल़ी
या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी ड़ॉ बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी ड़ॉ इंदुराणी जाखड उपस्थित होत्या. यंदा शहरातील मारुती मंदिर येथील गणेशोत्सव रद्द करण्यात आल्याची माहितीही सामंत यांनी दिल़ी चाकरमान्यांना कोणताही त्रास होवू नये म्हणून महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे निर्देश संबंधितांना दिले असून पुण्यामार्गे येणाऱया चाकरमान्यांना टोलमाफी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल़े जिह्यामध्ये 18 ठिकाणी वेलकम पाँईट राहणार आहेत. तसेच यंदा गणेशोत्सवासाठी मोठय़ा मिरवणुकांना परवानगीही राहणार नसल्याचे त्यांनी सांगितल़े जिल्हाभरात आरत्या, भजने साधेपणाने कराव्यात, असे आवाहन सामंत यांनी केल़े
महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवणार
चाकरमान्यांमध्ये कोणी कोविडबाधित सापडला तर त्याचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आह़े गणेशोत्सवादरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आह़े तसेच अपघात घटल्यास रुग्णवाहिका व क्रेन देखील तैनात राहणार आह़े गतवर्षीप्रमाणे यंदाही नगर परिषदेमार्फत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी तलाव तयार करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
प्राणी संग्रहालयासाठी 50 एकर जागेची गरज
आरे-वारे येथे होणाऱया प्राणी संग्रहालयाची प्रस्तावित जागा ही सीआरझेड 1 मध्ये येत असल्यामुळे येथे कोणतेही बांधकाम करता येणार नाह़ी त्यामुळे या संग्रहालयासाठी दुसऱया जागेचा शोध घेण्यात येणार आह़े प्राणी संग्रहालयासाठी 50 एकर जागेची आवश्यकता राहणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
महामार्ग सुस्थितीत करण्याचे निर्देश
मुंबई-गोवा हा महामार्ग गणेशोत्सवादरम्यान चांगला होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण अथवा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मुख्य अभियंत्याबरोबर या मार्गाची पाहणी करणार आहेत़ या मार्गावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याचे निर्देश त्यांनी बांधकाम खात्याला दिले.









