आढावा बैठकीत खासदारांकडून माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
ठरावीक मुदतीत शासकीय योजना पूर्ण कराव्यात, यासाठी अधिकाऱयांनी प्रामाणिकपणे व दक्षतेने काम करावे. तरच सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासाला अधिकारी पात्र ठरतील, असे खासदार मंगला अंगडी यांनी सांगितले. सुवर्ण विधानसौधमध्ये बुधवारी झालेल्या जिल्हा विकास समन्वय आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.
उद्योग खात्री योजनेंतर्गत एका कुटुंबाला 100 ते 150 दिवस रोजगार उपलब्ध करून द्यावा. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त उद्दिष्ट गाठावे, अशी सूचना या बैठकीत करण्यात आली. याचवेळी खासदार इराण्णा कडाडी यांनी कामगारांना मजुरी देण्यात कोणत्याच अडचणी नाहीत. तसेच लागणाऱया सामग्रीची बिलेही वेळेत अदा करण्याची सूचना अधिकाऱयांना केली.
उद्योग खात्री योजनेंतर्गत 2021-22 सालासाठी 1 कोटी 25 लाख दिवस रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. 7 लाख जणांना जॉबकार्ड वितरित करण्यात आली आहेत. 235 तलाव निर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 148 तलावांची कामे प्रगतीपथावर असून 59 पूर्ण झाली आहेत, अशी माहिती जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, शिक्षण खात्याचे उपसंचालक गजानन मण्णीकेरी आदींसह वेगवेगळय़ा खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.









