माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ मोहीम सुस्साट
प्रतिनिधी/ रत्नागिरी
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिह्यात गृहभेटीतून आतापर्यंत 6 लाख 54 हजार 634 नागरिकांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या तपासणीत 448 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 153 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. एवढे रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यासह त्यांच्यामार्फत होणारा प्रसार थांबवण्याचे महत्वपूर्ण काम अवघ्या काही दिवसात या मोहिमेने साधले आहे.
या मोहिमेअंतर्गत जिह्यात 1446 पथके घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत आत्तापर्यंत 1 लाख 86 हजार 440 घरांना भेटी देण्यात आल्या. यातून एकूण 2 लाख 398 कुटुंबातील 6 लाख 54 हजार 634 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासले जाते. गरज वाटल्यास 6 मिनिटांची वॉक टेस्ट घेतली जाते. कोरोनाची लक्षणे, वेळीच उपचारांचे महत्व व दैनंदिन व्यवहारात घ्यावयाची काळजी, याबद्दल मार्गदर्शनही केले जात आहे. या तपासणीदरम्यान 27 हजार 887 घरे बंद असल्याचे आढळून आले.
या तपासणी मोहिमेत ज्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 533 इतकी आढळली आहे. ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाऱया एकूण व्यक्तींची संख्या 872 इतकी होती. या मोहिमेमुळे रुग्ण वेळेवर शोधून उपचार सुरु होणे व त्या रुग्णाद्वारे होणारे संक्रमण रोखणे, हे महत्त्वपूर्ण काम युध्दपातळीवर शक्य होत आहे.









