पूरस्थिती, मालमत्तांचेही मोठे नुकसान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्ह्य़ात गेल्या 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी ग्नपूरस्थिती तर घरे व इतर मालमत्तांची मोठी हानी होत आहे. बुधवारीही जिल्हय़ात सरासरी 77.47 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आणखी 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या रविवारपासून जिल्ह्य़ात धुर्वॉधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती, दरड कोसळणे, घरे, गोठे व इतर मालमत्तांच्या नुकसानीच्या घटना घडत आहेत. बुधवारीही जिल्हय़ात पावसाने जनजीवन प्रभावित झाले आहे. जिह्यात बुधवारी सकाळपर्यंत 24 तासात सरासरी 77.47 मिमी तर एकूण 697.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यात मंडणगड 44.80 मिमी, दापोली 28.20 मिमी, खेड 164.40 मिमी, गुहागर 106.00 मिमी, चिपळूण 90.10 मिमी, संगमेश्वर 64.40 मिमी, रत्नागिरी 86.50 मिमी, राजापूर 57.00 मिमी,लांजा 55.80 मिमी. पावसाची नोंद झाली. जिह्यात कोठेही जीवीत हानीची नोंद झालेली नाही.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडे 16 जून रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार, नैसर्गिक आपत्तीमुळे विविध भागात नुकसानाची नोंद करण्यात आली. त्यात दापोली तालुक्यात मौजे पॅम्प येथील एज्युकेशन सोसायटीत विजेच्या धक्क्यामुळे विद्युत उपकरणाचे अंशतः 5 लाख 91 हजार 130 रुपयांचे नुकसान झाले. मौजे माटवण येथे सार्वजनिक पाण्याच्या टाकीची संरक्षक भिंत पडून अंशतः 4 हजार रुपयांचे, ।मौजे बांगतीवरे येथे गोविंद लक्ष्मण शिंदे यांच्या घराचे अशंतः 16 हजार 50 रुपयांच तर मौजे कळबट येथे शेवंती नारायण महबहे यांच्या घराचे अंशतः 65 हजार 650 रुपयांचे नुकसान झाले.
चिपळूण विभागातील वनोशी-पन्हाळ मार्गावर व खेड-दापोली राज्य मार्गावर दरड कोसळल्याने हे रस्ते बंद झाले होते. बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरु होते.
राजापूर तालुक्यात हातिवले येथे संजय शिंदे यांच्या घराची सरंक्षक भिंत कोसळल्याने अंशतः नुकसान झाले. कोंडवाडी येथे अनंत रहाटे यांच्या गोठय़ाचे, कोळवण येथे निता शिवाजी मोरे यांच्या घराचे, चौके येथे प्रकाश शिवाजी चिंदरकर यांच्या घराचे, कुंभवडे येथे जि. प. शाळेची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशतः नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. जिह्यात पावसाचा जोर पुढील 4 दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.









