माजी खासदार तथा प्रदेश सचिव नीलेश राणेंचा निर्धार
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता आपल्या कुटुंबातील सदस्य आहे. कार्यकर्तेच पक्ष वाढवत असतात, नेते नव्हेत. कार्यकर्ता हा पक्ष जीवंत ठेवणारा मुख्य घटक आहे. या भावनेने काम केले तरच पक्ष अधिक भक्कम होईल. त्यासाठी गावपातळीवर काम करणाऱया कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे नेत्यांचे काम आहे. भारतीय जनता पार्टी यापुढे जिह्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याबरोबरच आगामी ग्रामपंचायतीपासून लोकसभा निवडणुकीत यश मिळविण्याचा निर्धार सर्वांनी एकत्र येऊन करण्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपा नवनियुक्त प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा भाजपाच्यावतीने येथील जिल्हा नगर वाचनालयाच्या सभागृहात बुधवारी नीलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने, प्रदेश सदस्य ऍड. बाबासाहेब परुळेकर, राजेश सावंत, राजन देसाई, सचिन वहाळकर, नगरसेवक उमेश कुलकर्णी, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, रवींद्र नागरेकर, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा भाजपाच्यावतीने राणे यांचा शाळ, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. युतीच्या काळात कोकण विकासाच्या योजना आणल्या गेल्या. पण गेल्या 2005 नंतर रत्नागिरीत भाजपाला ग्रहण लागले होते. पण आता उत्तरायणाचा सुरू असलेला काळ भाजपाला फलदायी ठरणार आहे. खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली येथील भाजपा एक नंबर करायची असल्याचे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले. त्यासाठी सर्व नेते, पदाधिकारी यांनी हातात हात घालून संघटनेला वैभवाकडे नेण्यासाठी घेऊन जावे लागणार आहे. जनतेच्या मनात परिवर्तन करून कोकणातील तरूणांना काम द्यायचे असल्याचे माने यांनी सांगितले.
येथील भाजपाचा कार्यकर्ता संभ्रमावस्थेत होता. माजी खासदार नीलेश राणे यांना प्रदेश सचिव पद मिळाल्याने रत्नागिरीत भाजपाचे राजकीय वजन वाढल्याचे जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. रत्नागिरीसाठी आता खंबीर पालक लाभला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षा दुणावल्यात. त्यामुळे आता राजकीयदृष्टय़ा अधिक सजग झालेली भाजपा दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रा.प. निवडणुकीत वाढलेली भाजपा सदस्यांची 297 ही संख्येने बळ वाढल्याचा प्रत्यय दिला आहे. त्यामुळे या नीलेश राणेंच्या रुपाने लाभलेल्या प्रखर नेतृत्वाच्या बळावर संघटनेचे उद्दीष्ट आत्मसात करण्याचे व्रत घेऊया, असे ऍड. दीपक पटवर्धन यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना, राष्ट्रवादीवाल्यांना आलेय सत्तेची मस्ती
प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी यावेळी राज्य सरकार टीका केली. हे सरकार अनेक गोष्टीत चुक करत आहे. ज्या नेत्यांना आझाद मैदानावरील शेतकऱयांना, मराठा बांधवांना भेटायला वेळ नाही ते दिल्लीत जावून शेतकऱयांबरोबर फोटो काढतात. मराठा आरक्षणाचे नेमके काय झाले. शिवसेना, राष्ट्रवादीवाल्यांना सत्तेची मस्ती आल्याचे म्हणाले. पण एकदिवस आमचीही सत्ता येईल, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. गेली 15 वर्षे आमदार असलेल्या उदय सामंत यांनी रत्नागिरी जिह्यात पर्यटनासाठी काय केले, असा प्रश्नही नीलेश राणे यांनी उपस्थित केला.
तरीही राणेंवर अनेकांना विजय मिळवता आला नाही
निवडणुकीत राणेंचा पराभव झाला तरीही अनेकांना राणेंवर विजय मिळवता आला नाही. त्यामुळे अनेक नेते कायम खासदार नारायण राणेंवर टीका करतात. आपणाला चुकीच्या गोष्टींबद्दल प्रचंड राग येतो. म्हणूनच मी स्पष्टपणे त्यावर व्यक्त होतो, हे अनेकांना पटत नाही. आजच्या राजकारणात शांत राहून चालत नाही. जशास तसे उत्तर दिले तरच काम करणे शक्य आहे. राणेंची काम करण्याची पध्दत वेगळी आहे. नेता म्हणून मिरवण्यासाठी मी आलेलो नाही. मला सर्वसामान्य जनतेच्या सुखात सहभागी होत त्यांच्यासाठी काम करायला आवडते. मला पद कोणतेहि मिळो मरेपर्यंत कार्यकर्ता म्हणूनच काम करत राहणार असल्याचे नीलेश राणे यांनी सांगितले.
विविध क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱयांचा कमल पुरस्काराने गौरव
यावेळी रत्नागिरीतील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱया डॉ. अजय मयेकर, डॉ. मणचेकर, डॉ.अभिजित खानविलकर, डॉ. किर्तीकुमार पिलणकर, उद्योजक ममता नलावडे, बांधकाम व्यावसायिक प्रसाद वाघधरे, योगेश सरपोतदार, सुनील भोंगले, गणेश धुरी, क्रीडा मार्गदर्शक राजेश कळंबटे, क्रीडापटू कुमारी हुनेरकर, तसेच नेहा जोशी, सलोनी डांगे, महादेव, माई जमादार, भजनसम्राट भगवानबुवा लोकरे, डॉ. मिलिंद सावंत, ऋचा ताम्हणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ओमसाई मित्रमंडळ नाचणे, राजरत्न प्रतिष्ठान, श्रीरंग नाटय़संस्था, संपर्क युनिट फाऊंडेशन, विनंती महिला गृहउद्योग, सिध्देश करंगुटकर यांनाही कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.









