प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येतही वाढ सुरूच आहे. गेल्या आठवडय़ात 90 च्या घरात असलेली रुग्णसंख्या रविवारी सायंकाळपर्यंत 175 वर पोहोचली आहे. या रुग्णांवर सरकारी व खासगी इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हा आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॅक फंगसच्या रुग्णात वाढ होत चालली आहे. उपचारासाठी सरकारी इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांसाठी 343 लस आल्या आहेत. खासगी इस्पितळांना ब्लॅक फंगसवरील लस वाटप करण्याची जबाबदारी औषध नियंत्रण विभागाकडे आहे.
जिल्हा आरोग्याधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सरकारी व खासगी इस्पितळात 42 जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ब्लॅक फंगसवरील उपचारासाठी आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चाललेली असताना ब्लॅक फंगसच्या रुग्णसंख्येतील वाढ आरोग्य विभागाची चिंता वाढविणारी आहे.









