दोघा जणांचा मृत्यू, शारीरिक स्वच्छता राखण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात ब्लॅक फंगसचा संसर्ग झालेल्यांची संख्या वाढतच आहे. गेल्या आठवडय़ात जिल्हय़ात केवळ 9 रुग्ण होते. आता ही रुग्णसंख्या 43 वर पोहोचली आहे. आतापर्यंत दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. बाधितांवर बेळगावातच उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हा आरोग्य व कुटुंबकल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 43 जणांना ब्लॅक फंगसची बाधा झाली आहे. त्यापैकी 22 बाधितांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित 21 जणांवर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. ब्लॅक फंगस बाधितांच्या संख्येत चिंतनीय वाढ होत आहे.
गेल्या रविवारी आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ात ब्लॅक फंगसच्या रुग्णांची संख्या 9 होती. त्यापैकी गोकाक व अथणी तालुक्मयातील दोन वृद्धांचा मृत्यू झाला होता. केवळ आठवडय़ाभरात रुग्णसंख्या 43 वर पोहोचली आहे. ब्लॅक फंगस टाळण्यासाठी काय करावे, वैयक्तिक स्वच्छतेवर कशी भर द्यावी? यासंबंधी सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे.
एकाच मास्कचा वारंवार वापर करू नये. वैयक्तिक स्वच्छतेवर प्रत्येकाने भर द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. ब्लॅक फंगसवर उपचारासाठी यापूर्वी हुबळी येथील किम्सला रुग्णांना पाठविले जात होते. आता सिव्हिल हॉस्पिटलमध्येच उपचाराची सोय करण्यात आली आहे. 21 रुग्ण खासगी इस्पितळात उपचार घेत आहेत.
उपचारासाठी आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप होत होता. यासंबंधी आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता बिम्सला सरकारकडून औषधपुरवठा होत आहे. आरोग्य विभागाकडून ही औषधे बिम्सला पोहोचविण्यात येत आहेत. तर खासगी इस्पितळांना औषधपुरवठा करण्याची जबाबदारी औषध नियंत्रण विभागावर आहे.









