राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांच्या कारवायांचाही धडाका
प्रतिनिधी/ गोडोली
कोरोनाचा खात्मा करण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मद्यपींच्या घशाला मात्र कोरड पडली आहे. दारूची तलफ भागवण्यासाठी कितीही रूपये मोजावे लागले तरी बेहत्तर असा जणू पण करणाऱयांचा फायदा बेकायदा दारू विक्री करणाऱयांनी उठवायला सुरूवात केली आहे. परमिट रुम, बिअरबार बंद असताना छुप्या पद्धतीने दारूची विक्री जोरात सुरू आहे. पोलीस व राज्य उत्पादन शुल्क जरी कारवाया करत असले तरी दारूची वाहतूक आणि विक्री मात्र थांबली नाही. राज्य उत्पादन शुल्कने रविवारी रात्री अवैध दारू वाहतूक करणाऱया कोडोली येथील आकाश माने याला ताब्यात घेऊन सुमारे 7 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कोरोनाच्या धास्तीने असलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व प्रकारच्या मद्य विक्रीस बंदी घातली असताना चढय़ा दराने चोरुन दारू विक्री करून उखळ पांढरे करून अनेक जण घेत आहेत. यात औद्योगिक वसाहत, कोडोली परिसरात मोठय़ा प्रमाणावर चोरून दारू विक्री करणाऱया अहिल्यानगर, कोडोली येथील आकाश दत्तात्रय माने याला बलेरो गाडीतून मुद्देमालासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकांच्या गस्त पथकाने ताब्यात घेतले. अधिक तपास केला असता सदरची दारु संगिता श्रीकांत भोसले या महिलेचा परवाना असलेल्या धनगरवाडी (कोडोली) येथील देशी दारू दुकानातून अवैध पध्दतीने आकाश माने याने घेतलेले निदर्शनास आले आहे. संगिता श्रीकांत भोसले हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला जाणार असल्याचे निरीक्षक शहाजी पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
जिह्यात राज्य उत्पादन शुल्क, सातारा विभागाची लॉकडाऊनच्या काळात अवैध मद्य वाहतूक, विक्रीवर कारवाईचा धडाका लावला आहे. सातारचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्याची तस्करी करणाऱयांचा बिमोड करण्याचा सपाटा लावला आहे.
सातारा येथील जुनी एम.आय.डी.सी (अहिल्यानगर) येथून सातारा हायवेच्या दिशेने जाणाऱया संशयित वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱया रंगाची बलेरो या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता सदर संशयित वाहनामध्ये बेकायदेशीर देशी दारुचे विविध बॅण्डचे एकूण 38 बॉक्स मिळून आले असून वाहनासह एकूण मिळून रु. 7 लाख 97 हजार 32 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई निरीक्षक शहाजी पाटील, बबनराव पाटील, सुनील खराडे, शांताराम डोईफोडे, प्रशांत देशमुख, जवान नितीन इंदलकर, संतोष निकम, महेश मोहिते, अजित रसाळ, किरण जंगम, विक्रम भोसले यांनी यशस्वीरित्या पार पाडली.








