जिल्हाधिकाऱयांचे आवाहन : अफवांवर विश्वास ठेवू नका!
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राज्यातील परभणी जिल्हय़ात 10 जानेवारीला कोंबडय़ा तसेच कावळे बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूचा
प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हय़ातील कुक्कुटपालक आणि नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
दरम्यान, या पोल्ट्री फार्मवर अचानकपणे मोठय़ा प्रमाणावर कोंबडय़ांचा अनैसर्गिक मृत्यू होत असल्यास त्याची माहिती नजीकच्या पशुवैद्यकीय
संस्थाप्रमुखांना द्यावी, पोल्ट्री फार्मवरील पक्ष्यांचा इतर जंगली पक्ष्यांशी (उदा. बदके, कबुतर, पोपट, चिमण्या, कावळे) अशा पक्ष्यांशी संपर्क होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच जैवसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी. कुक्कुट पालकांनी पोल्ट्री फार्म व परिसरात स्वच्छता बाळगावी. नियमित सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, 4 टक्के फॉरमॅलिन, चुना लावून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, संशयित, रोग प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरील पक्ष्यांची तसेच खाद्याची वाहतूक, खरेदी, विक्री बंद करावा। असे आवाहन करण्यात आले आहे.
अशी आहेत लक्षणे
कोंबडय़ांच्या नाकातून चिकट स्त्राव येणे, श्वसनास त्रास होणे, चेहऱयावर सूज येणे, गलोल व तुरा निळा पडणे, वि÷ा पातळ होणे तसेच पक्षी मलूल व निस्तेज दिसणे अशी या रोगाची लक्षणे असून कुक्कुट पालक तसेच कुक्कुट पालन क्षेत्रातील कर्मचाऱयांनी याविषयी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
चिकन, अंडी योग्य तापमानावर शिजवा!
चिकन स्वच्छ करताना हॅण्ड ग्लोव्हजचा वापर करावा. बर्ड फ्लूचा विषाणू 60 अंश सेंटिग्रेडच्या पुढील तापमानास पूर्णपणे नष्ट होतो. त्यामुळे चिकन व अंडी 100 अंश सेंटिग्रेड तापमानावर शिजवावीत. सोशल मीडिया व अन्य प्रसार माध्यमातून प्रसारित अफवांवर विश्वास ठेवू नये. स्थलांतरित पक्षी येणाऱया जलाशयांच्या ठिकाणी पक्षी मृत झाल्याचे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले आहे.
अधिक माहितीसाठी www.dahd.nic.in तसेच www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. बर्ड फ्लू हा पक्ष्यांचा रोग असून देशात आजपर्यंत तरी पक्ष्यांपासून मानवाला या रोगाची लागण झालेली दिसून आलेली नाही. तरीदेखील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. दिलीप शिंपी यांनी केले आहे.









