जि. प. राबविणार योजना : पोल्ट्रीमधील अंडी अंगणवाडय़ांमधील मुलांना देणार
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा परिषदेमार्फत जिल्हय़ातील महिला बचतगटांसाठी पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्याची योजना राबवून याच पोल्ट्रीमधून अंगणवाडय़ांमधील मुलांना अंडी देण्याची नवी योजना राबविण्याचा महत्वाचा निर्णय जि. प. च्या स्थायी समितीच्या सभेत सोमवारी घेण्यात आला. या योजनेला निधी मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचेही ठरविण्यात आले.
जि. प. च्या स्थायी समितीची सभा सोमवारी जि. प. अध्यक्षा समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नाथ पै सभागृहात झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय समिती सभापती रवींद्र जठार, सावी लोके, माधुरी बांदेकर, गटनेते रणजित देसाई, सदस्य संजना सावंत, संतोष साटविलकर, विष्णूदास कुबल, अमरसेन सावंत, सुनील म्हापणकर, सचिव राजेंद्र पराडकर, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बचतगटांना स्वयंरोजगार
महिला स्वयंसहाय्यता बचतगटांना पोल्ट्री व्यवसाय सुरू करून दिल्यास त्यांचा स्वयंरोजगार निर्माण होईल. त्याचबरोबर या पोल्ट्रीमधील अंडी अंगणवाडय़ांमधील मुलांना द्यायची म्हणजे मुलांना पोषण आहारातील अंडी मिळतील आणि बचतगटांना आर्थिक मदत होईल, असा प्रस्ताव सभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी ठेवताच ही योजना जि. प. मार्फत राबविण्यास मंजुरी देण्यात आली. या योजनेला निधी मिळण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले.
भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी योजना
सिंधुदुर्गनगरीमध्ये मोठय़ा प्रमाणात भटक्मया कुत्र्यांचा वावर सुरू असल्याकडे रणजित देसाई यांनी लक्ष वेधले. भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जि. प. च्या पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळ नसल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांमार्फत भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निर्बिजीकरण करण्याची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
भडगाव सरपंच, ग्रामसेवकाकडून अनियमितता
जनसुविधामधून मंजूर कामाचे आदेश जाण्यापूर्वीच भडगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक निविदा काढून मोकळे झाले. त्यामुळे अनियमिता केली असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. त्यावर निलंबन करण्यासारखा त्यात काही मोठा दोष नाही, असे सांगताच रणजित देसाई यांनी आक्रमक होत आर्थिक अनियमितता दिसत नसली, तरी निविदा प्रक्रियेमध्ये अनियमितता झाली आहे. त्यामुळे कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.
मंगेश पाडगावकर स्मारकाचे काय झाले?
कवी मंगेश पाडगावकर यांचं स्मारक वेंगुर्ले येथे उभारणार, असे गेली तीन वर्षे ऐकतोय. पण अजून काही स्मारक झालं नाही, दीड कोटी मंजूर आहेत, तर काम का होत नाही, असा प्रश्न दादा कुबल यांनी केला असता जागेची थोडी अडचण होते, असे प्रशासनाने सांगताच जागा मिळत नसेल, तर जिल्हा परिषदेची जागा शोधून देऊ. मात्र मंगेश पाडगावकर यांचे स्मारक झाले पाहिजे, अशी सूचना देसाई यांनी केली.
शाळांसाठी पाच कोटी उपलब्ध
शाळा दुरुस्तीसाठी अडीच कोटी आणि शाळा बांधकामासाठी अडीच कोटी रुपये जिल्हा निजोजनमधून प्राप्त झाले आहेत. तसेच समग्र शिक्षण अभियानमधून 139 शाळा वर्गखोल्यांसाठी चार कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.
चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव
चिपी विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी आमदार नीतेश राणे यांनी केल्यानंतर स्थायी समिती सभेमध्येही रणजित देसाई यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, असा ठराव मांडला. या ठरावाला शिवसेना सदस्य सुनील म्हापणकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने ठराव मंजूर करण्यात येऊन हा ठराव शासनाला पाठविण्याचे ठरविण्यात आले.
विधिमंडळामध्ये सत्ताधारी आमदार करतात काय?
क्मयार चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हय़ाला 25 कोटी जाहीर झाले. मात्र त्यातून फक्त 11 लाख रुपयेच मिळाले आहेत. ही फसवणूक असून सत्ताधारी आमदार विधिमंडळामध्ये करतात काय, असा प्रश्न रणजित देसाई यांनी केला. त्यावर शिवसेना सदस्य सुनील म्हापणकर यांनी पलटवार करीत मग तुमचे आमदार काय करतात, असा प्रश्न केला. त्यावर देसाई यांनी तुमची सत्ता आहे. वजन वापरा, असे सूचित केले.









