ओढ दिलेल्या पावसाचे पुनरागमन : बळीराजा सुखावला
प्रतिनिधी/ सातारा
पेरण्या केल्यानंतर उगवलेली पिके पाहून आनंदित झालेला बळीराजा पावसाने ओढ दिल्याने संकटात सापडू पाहत असताना सोमवारी रात्रीपासून सातारा जिल्हय़ाच्या पश्चिम भागात महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने पुनरागमन केले असून रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे कोयना धरणातील पाणी साठय़ात दोन टीएमसी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी कोयना धरण परिसरात 175 मि. मी., महाबळेश्वर 181 मि. मी. तर नवजाला 191 मि. मी. पावसाची नोंद झाली असून रिमझिम बरसात दिवसभर सुरुच होती.
जिह्यात आतापर्यंत सरासरी 518.13 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 308.46 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 21.43 मि. मी. पाऊस झाला आहे. पश्चिम भागातील महाबळेश्वर, कोयनानगर, नवजा, बामणोली, तापोळा भागात सोमवारपासून पावसाचा जोर अधिक वाढला आहे. जिल्हय़ात कराड, सातारा, जावली, वाई तालुक्यांमध्ये चांगला पाऊस पडत असून जवळपास महिनाभरानंतर सुरु झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला आहे. मंगळवारी सकाळी कोयना धरणात 6071 क्युसेक्स वेगाने पाणी येत होते त्यामुळे आता धरणातील पाणी साठा 54.30 टीएमससी झाला असून धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.
चक्रीवादळाच्या तडाख्यात यंदा पाऊस जून महिन्याच्या 1 तारखेला दाखल झाला. पावसाचा वाढता जोर पाहून यंदाही गतवर्षी सारखा मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज लावण्यात आला. मात्र जून अखेर पावसाचा जोर मंदावला. पावसाने उघडीप द्यायला सुरूवात केली. ही उघडीप शेतकऱयांची चिंता वाढवू लागली. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीपासून सातारा जिह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली. कमी-जास्त प्रमाणात पडणाऱया पावसाचा जोर वाढला. मंगळवारी सकाळपासून पडणाऱया पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले.
लॉकडाऊनमुळे बाजारपेठ ठप्प झाली होती. या बाजारपेठेवर पावसाचा जोर वाढल्याने परिणाम झालेला आहे. लोकांनी घराबाहेर न पडता घरात बसणे पंसत केले आहे. दरवर्षी पावसाळयात कास, ठोसेघरच्या पर्यटनाला गती आलेली असते. मात्र कोरोनामुळे ही गती मंदावलेली आहे. जिह्यातील विविध तालुक्यांमध्ये पाऊस पडत असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. वातावरणात बदल होऊन गारवा निर्माण झाला आहे. कोरोनाची धास्ती वाढत असताना साथीच्या आजारांनी निमंत्रण मिळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
जिह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 9.36 (354.43), जावली 33.10 (646.33), पाटण 45.73 (597.73), कराड 16.15 (297.15), कोरेगाव 5.89 (260.61), खटाव 1.93 (255.06), माण 0.29 (245.71), फलटण 0 (242.40), खंडाळा 11.65 (227.40), वाई 23.29 (366.24), महाबळेश्वर 161.08 (2206.36). याप्रमाणे आजपर्यंत एकूण 5699.41 मि. मी. तर सरासरी 518.13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना धरणात 49.07 उपयुक्त पाणीसाठा
कोयना धरणात आज 49.07 उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 49.01 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 175, नवजा येथे 191 व महाबळेश्वर येथे 181 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिह्यातील प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम 4.94 (42.29), धोम बलकवडी 2.08(52.59), कण्हेर 4.44 (46.23), उरमोडी 6.41 (66.35), तारळी- 2.90 (49.58), निरा-देवघर 3.05 (26.01), भाटघर 9.48 (40.35), वीर 3.77 (40.09).








