संघटनेच्या बैठकीत निर्णय, विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन
वार्ताहर/ चिपळूण
टाळेबंदीमुळे उपासमारीची कुऱहाड कोसळलेली असतानाच शासनाकडून सलून दुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या जिल्हा नाभिक समाज संघटनेने ‘हत्यार बंद’ आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी चिपळुणात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत समाजबांधवांनी आपल्या व्यथा मांडतानाच शासनाच्या बदलत्या धोरणावर संताप व्यक्त केला. आता सहनशक्ती संपली असून शासन दुकाने उघडण्यास परवानगी देत नसेल तर उपाशी मरण्यापेक्षा रस्त्यावर उतरून हक्क मिळवू, अशा संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या. नाभिक समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्याचे ठरले. तसेच यापुढे कोणीही कोणाच्याही घरी जाऊन नेते, पुढारी, अधिकाऱयांची केस व दाढी करणार नाही, कोणत्याही विधीकार्याला नाभिक बांधव काम करणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील, असे पदाधिकाऱयांनी जाहीर केले. त्यानुसार आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी या बैठकीत रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण तथा बावा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सर्व तालुकाध्यक्ष व जिह्यातील प्रमुख पदाधिकाऱयांची एक आंदोलन समिती गठीत करण्यात आली. या समितीला सर्वाधिकार देण्यात आले. तसेच ‘हत्यार बंद’ आंदोलनाच्या कालावधीत व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी 25 जणांची टीम कार्यरत ठेवण्यात आली आहे.
प्रांत, तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन
या पार्श्वभूमीवर मंगळवारी चिपळूण तालुका नाभिक समाजोन्नती संघटनेमार्फत विविध मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना देण्यात आले. या निवेदनात शासनाने सलून दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, नाभिक समाजातील प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात 15 हजार रुपये जमा करावेत, सलून व्यावसायिकाला 50 लाखांचे विमा संरक्षण तसेच सुरक्षितता कीट देऊन नाभिक समाजाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष महादेव चव्हाण, तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, सल्लागार संजय जाधव, शहराध्यक्ष विशाल राऊत, पत्रकार राजेंद्रकुमार शिंदे, संदीप शिंदे, दसपटी अध्यक्ष अजित चव्हाण, माजी शहर अध्यक्ष सचिन साळुंखे, सावर्डे अध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते.









