संगमेश्वर-फुणगूस खाडीपट्टय़ात पूरजन्य स्थिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गेले 6 दिवस जिल्हय़ाला धुवाधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. रत्नागिरीनजीकच्या गौतमी, काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पावससह टेंभेपूल भागात पाणी शिरले. संगमेश्वर-फुणगूस खाडीचेही पाणी वाढल्याने परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी मटण-मच्छीमार्केटमध्ये घुसले. आणखीन 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
सतत पडणाऱया पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस येथे सखल भागात पाणी शिरले होते. गौतमी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी समाधी मार्गावर मोठय़ा प्रमाणावर पाणी साचल्याने वाहतूक मार्ग बंद करण्यात आला होता. तसेच संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस येथील शास्त्राr खाडीने पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्टय़ात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण खाडीभागाला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याचे दिसले. फुणगूस बाजारपेठेत सुमारे 3 ते 4 फूट पाणी शिरले होते. तसेच रत्नागिरीनजीकच्या टेंभेपूल भागातील सखल भागातही पाणी शिरले. तर काजळी नदीला पूर आला. गणपतीपुळे मार्गावरील भंडारपुळे गावात शैलेश धोंडू सुर्वे यांच्या मालकीच्या 2 म्हशी विजेचा शॉक लागून मृत झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. गेल्या 24 तासात सरासरी 101.43 मिमि पावसाची नोद झाली आहे.
गुडेवठारातील गणेशमूर्ती चित्रशाळेत पाणी
शनिवारीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी भरत असल्याचे प्रकार घडत आहेत. रत्नागिरी शहरातील गुडेवठार या भागात असलेल्या विलणकर यांच्या चित्रशाळेत गणेशमूर्ती बनवण्याचे काम सुरू होते. येथे अनेक गणेशमूर्ती बनवण्यात आल्या होत्या. शनिवारी पडलेल्या पावसाने व या ठिकाणची नगर परिषदेची गटारे व्यवस्थित नसल्याने पावसाचे पाणी संपूर्ण परिसरात भरून विलणकर यांच्या चित्रशाळेतही शिरले.
सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात
जिल्हय़ात शनिवारी सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात 189.30 मिमि पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस चिपळूण 54.30 मिमि इतका पडला आहे. जिल्हय़ात एकूण 912.90 मिमि तर सरासरी 101.43 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
पावस येथे रस्त्यावर पाणीच पाणी
गौतमी नदीच्या पाण्यात वाढ झाल्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिराकडे जाणाऱया रस्त्यावर पाणीच पाणी भरले. तसेच शेती, नालेही तुडुंब भरले. रस्त्यावर पाणीच पाणी असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक बंद करण्यात आली होती. जोरदार पावसामुळे जवळपास 10 वर्षापूर्वी पावस परिसरात अशी परिस्थिती उद्भवली होती.









