प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ात लवकरच लाळखुरकत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. त्यासाठी तीन-चार आठवडय़ांपूर्वी जंतनाशक औषध देणे आवश्यक आहे. याकरिता पशुसंगोपन खात्यावतीने जिल्हय़ातील लहान-मोठय़ा 271 पशुवैद्यकीय दवाखान्यांतून पशुपालकांना जंतनाशक औषधांचे वितरण केले जाणार आहे.
जिल्हय़ात साधारण 12 लाख 80 हजार जनावरे आहेत. या सर्व जनावारांना जंतनाशक औषध दिले जाणार आहे. बेळगाव तालुक्मयातून जंतनाशक औषध वितरणाला प्रारंभ झाला आहे. जनावरांमध्ये जंताची समस्या ही प्रामुख्याने आढळून येते. त्यामुळे जनावरांचे आरोग्य निस्तेज व कमजोर दिसते. पावसाळय़ात जनावरांच्या पोटात जंत आणि कृमींची मोठय़ा प्रमाणात वाढ होत असते. जंतांकडून खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्त्वांचे पोषण होते. जनावरांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. याकरिता खात्यामार्फत जंतनाशक औषधांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय अधिकाऱयांकडून पावसाळय़ात जनावरांची घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. पावसाळय़ात जनावरांना विविध आजारांची लागण होत असते. दरम्यान, ओल्या चाऱयातून जनावरांच्या पोटामध्ये जंत वाढतात. त्यामुळे पशुसंगोपन खात्याने जिल्हय़ातील सर्व जनावरांपर्यंत जंतनाशक औषधे पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार तालुकानिहाय पशुवैद्यकीय दवाखान्यांतून जंतनाशक औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लवकरच जिल्हय़ातील प्रत्येक जनावराला जंतनाशक औषध दिले जाणार असल्याची माहिती पशुसंगोपन खात्याने दिली.









