प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या शंभरवर गेली आहे. रविवारी जिल्हय़ातील आणखी 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. अहवाल पॉझिटिव्ह आलेले सर्वजण राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्याला गेले होते. तेथून परतल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता निजामुद्दीन मरकजपाठोपाठ अजमेर कनेक्शनमुळे कोरोनाचा फैलाव वाढत चालल्याचे सामोरे आले आहे. अजमेरहून खासगी बसमधून बेळगावला आलेल्या या 38 पैकी 30 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 22 जण बेळगाव जिल्हय़ातील तर 8 जण बागलकोट जिल्हय़ातील आहेत.
रविवारी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये संपूर्ण राज्यात 54 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील 22 व बागलकोट जिल्हय़ातील 8 असे अजमेरहून परतलेल्या 30 जणांचा समावेश असून या 30 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे कोगनोळी तपास नाक्मयावरील पोलीस, महसूल कर्मचाऱयांचे अभिनंदन केले जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. बोम्मनहळ्ळी व जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांच्या सतर्कतेमुळे अजमेर कनेक्शनमुळे होणारा फैलाव वेळीच रोखला गेला आहे.
बेळगाव जिल्हय़ात कोरोनाबाधितांची संख्या 107 वर पोहोचली असून बेंगळूर पाठोपाठ राज्यात बेळगाव दुसऱया क्रमांकावर आले आहे. 88 रुग्णसंख्या असलेले म्हैसूर आतापर्यंत दुसऱया क्रमांकावर होते. रविवारी बेळगाव जिल्हय़ात आणखी 22 बाधितांची भर पडल्यामुळे एका दिवसात बेळगाव जिल्हय़ाने दुसरा क्रमांक गाठला आहे.
50 वषीय महिला, 17 वर्षीय तरुणी, 60 वषीय वृद्धा, 14 वषीय मुलगी, 40 वषीय महिला, 56 वषीय महिला, 60 वषीय वृद्धा, 25 वषीय महिला, 3 वर्षांची बालिका, 46 वषीय महिला, 50 वर्षीय महिला, 27 वषीय महिला, 8 वषीय बालिका, 38 वषीय युवक, 10 वषीय मुलगा, 63 वषीय वृद्ध, 20 वषीय तरुण, 29 वषीय तरुण, 12 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाचा मुलगा, 3 वषीय बालक व 6 वषीय बालकाचा या बाधितांमध्ये समावेश आहे.
बेळगाव शहर, चिकोडी, निपाणी, संकेश्वर, अथणी, रायबाग, गोटूर व बागलकोट जिल्हय़ातील बदामी परिसरातील 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे सर्व जण राजस्थानमधील अजमेर शरीफला गेले होते. 17 मार्च रोजी बेळगाव व बागलकोट जिल्हय़ातील एकूण सात कुटुंबातील 38 जण रेल्वेने अजमेरला गेले होते. यापैकी 22 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
155 जणांचे अहवाल निगेटिव्ह
रविवारी सायंकाळी जिल्हा आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार गेल्या 24 तासात बेळगाव जिल्हय़ातून पाठविण्यात आलेले 155 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी 272 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हय़ातील 7873 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. 2,966 जणांना चौदा दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 6 हजार 576 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी 6 हजार 121 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 107 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 37 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 77 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
बॉक्स
‘घाबरू नका, आम्ही सतर्क आहोत’ (जिल्हाधिकारी फोटो 10डीआय16)
जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी नागरिकांना निर्भय राहण्याचे आवाहन केले आहे. ‘घाबरू नका, आम्ही सतर्क आहोत. कोगनोळी तपासनाक्मयावर बाळगण्यात आलेल्या सतर्कतेमुळे अजमेर कनेक्शनमुळे होणारा कोरोनाचा फैलाव रोखला गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण अजमेरहून बेळगाव जिल्हय़ात प्रवेश केल्यापासून त्यांना तवंदी घाटातील गवाण येथील मोरारजी देसाई वसतिशाळेत संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा इतर कोठेही वावर झाला नाही. यामुळे संभाव्य मोठा धोका टळला आहे. या प्रकारामुळे जिल्हय़ाच्या सीमेवर तपासणी वाढविण्यात आली आहे. वैद्यकीय पथकेही तैनात आहेत. अजमेरहून आलेले 38 जण जर आपापल्या गावी परतले असते तर कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होण्याचा धोका होता. मात्र, अधिकाऱयांच्या सतर्कतेमुळे हा धोका टळला आहे’, असे त्यांनी सांगितले.
अथणी, चिकोडी, निपाणीत सतर्कता
रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 22 जणांमध्ये 13 महिला व 7 लहान मुलांचा समावेश आहे. बागलकोट व बदामी येथील 8 जणांनाही बेळगावमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हय़ातील 22 जण हे अथणी, चिकोडी, निपाणी, संकेश्वर, रायबाग, गोटूर परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. यामधील बहुतेक जण सरकारी विश्रामधामातील स्वयंपाकी असून ते सर्वजण आपापल्या कुटुंबीयांना घेऊन अजमेर शरीफला गेले होते. बेळगाव, बागलकोट जिल्हय़ातील 7 कुटुंबातील 38 जण अजमेरला गेले होते. त्यापैकी 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून आणखी 8 जणांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. हे 22 जण नेमके कोणकोणत्या गावातील आहेत याचा तपशील प्रशासनाने उघड केला नाही.









