शहरे, गावांमधील रस्ते ओस ः कोरोनाला हरवण्यासाठी नागरिक सज्ज
प्रतिनिधी/ सातारा
मार्च महिन्यापासून दुसऱया लाटेने तडाखा देण्यास सुरुवात केल्यानंतर जिल्हय़ातील कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर झाली आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरांमधील कोरोना संसर्ग आटोक्यात येवू लागला असताना सातारा जिल्हय़ात मात्र दिवसेंदिवस बाधित वाढीचा आवेग वाढतच आहे. त्यामुळे संसर्ग साखळय़ा तोडून कोरोना बाधित वाढीचा वेग कमी करण्यासाठी अखेर 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला असून त्यामुळे जिल्हाभरातील शहरे, गावे निमुर्नष्य झाली होती. रस्त्यावरील वर्दळ पूर्णपणे थंडावल्याने रस्ते ओस पडल्याचे चित्र पुन्हा अनुभवास आले.
गतवर्षी मार्च, एप्रिलमध्ये कोरोना संसर्गास सुरुवात झाली तेव्हा बाधितांची संख्या नगण्य होती. पुण्यामुंबईहून येणारे नागरिक बाधित म्हणून समोर येत होते. स्थानिक लोकांना कोरोनाची बाधा झाली नव्हती तरी प्रचंड भीतीचे वातावरण असल्याने लोकांनी तब्बल तीन महिने कडक लॉकडाऊनमध्ये काढले आहेत. यावर्षीचे चित्र त्याच्या नेमके उलट आहे. जिल्हय़ात एकूण बाधितांची संख्या दीड लाखाचा आकडा ओलांडून पुढे गेलीय. मात्र, लोकांच्या मनात कोरोनाविषयीची भीती पार निघून गेलीय.
त्यामुळेच गतवर्षी नियम पाळणारे नागरिक बिनधास्तपणे वावरत होते. लॉकडाऊन सुरु केला तरी नियम मोडणारांची संख्या अधिक होती. शेवटी आता कडक लॉकडाऊन म्हणजे पूर्णपणे संचारबंदी लागू केली गेली. वैद्यकीय सुविधा, मेडिकल व अत्यावश्यक सेवेसाठी इंधन सुविधा सोडल्यास काहीही सुरु राहणार नसल्याने लोकांची रस्त्यावरील वर्दळ पूर्णपणे थंडावली होती. जिल्हय़ातील सर्व मुख्य शहरांसह ग्रामीण भागातही नागरिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिल्याने वर्षभराने पुन्हा रस्त्यावर पूर्ण शांतता अनुभवास मिळाली.
वर्षभराने पुन्हा गूढ शांततेचा प्रत्यय
कोरोनाने समाजाचे जीवन उध्दवस्त केले आहे. दुसऱया असलेल्या किंवा नसलेल्या लाटेने पुन्हा लोकांना घरात बंद केले आहे. प्रशासनाने नियम कडक केल्याने नागरिक देखील नियम पाळून घरात बसले आहेत. शहरी भागात कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर असल्याने शेवटी नागरिक देखील एकदाचा टळू दे हा कोरोना म्हणून घरात बसल्याने जिल्हय़ातील सर्व व्यवहार ठप्प झाल्याने जिल्हय़ाने वर्षभराने पुन्हा एकदा गुढ शांतता अनुभुतीचा प्रत्यय घेतला असून आता उर्वरित पाच दिवस असाच कडक लॉकडाऊन पाळावा लागणार आहे.
कडक उन्हाचे चटके अन लॉकडाऊन
एकीकडे कडक उन्हाळय़ाने पुन्हा उग्र रुप धारण केले आहे. तापमानाचा पारा 35 ते 39 अंश सेल्सिअस अंशाकडे झुकला असून त्यातच कडक लॉकडाऊन करण्यात आला असल्याने लोकांना घरात बसण्याशिवाय पर्याय नाही. बाहेर पडले तर कडक उन्हाचे चटके तर घरात थांबले तर घामाच्या धारा अशा वातावरणात कोरोनाने जी स्थिती निर्माण केली त्या स्थितीवर राग काढत लोक घरात बसून राहिले आहेत.
गावेच्या गावे झाली लॉक
ज्या ज्या गावात कोरोनाच्या संसर्ग साखळय़ा निर्माण झाल्या आहेत. त्या त्या गावांमध्ये नागरिकांनी काही दिवसांपासून लॉकडाऊन कडक पाळण्यास सुरुवात केली आहे. काही अपवाद सोडल्यास सर्वच गावांमध्ये कोरोना बाधित असल्याने आता कोरोनाला संधी द्यायची नाही असा संकल्प करुन नागरिक घरात बसून राहिलेले असल्याने गावेच्या गावे लॉक झाली आहेत. इकडून तिकडून फिरणाऱयांना लॉकडाऊन कडक केल्याने चाप बसला होता.
जिल्हाभर कडेकोट बंदोबस्त
जिल्हा पोलीस दलाने लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी जिल्हय़ातील सर्व कोरोना स्थितीची माहिती घेवून त्यानुसार बंदोबस्ताचे नियोजन केले. ज्या ज्या गावात जास्त बाधित आहेत तिथे ग्रामदक्षता समिती अर्लट केल्याने तिथे कडक लॉकडाऊन पाळला गेल्याचे चित्र होते. तर बेशिस्तपणा करणारांवर कारवाई करण्यासाठी पोलीस दलाने पेट्रोलिंग वाढवले होते. तर महत्वाच्या सर्व ठिकाणी नाकेबंदी करुन वाटा अडवल्याने विनाकारण फिरणारांवर कारवाई झाली. कारवाईच्या भीतीने अनेकजण बाहेर न पडल्याचे पहिल्या दिवशी अनुभवास मिळाले.
मात्र, लोकांचा लॉकडाऊनला विरोधच
लॉकडाऊन केला तरी बाधितांची संख्या कमी होत नाही. आता कडक लॉकडाऊन केल्यानंतर काय अनुभव येणार हे सहा दिवसांनी कळेल. मात्र, कडक लॉकडाऊनला नागरिकांचा विरोधच असून याबाबत साताऱयातील ऍड. अमित द्रवीण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देवून लॉकडाऊनमुळे खरोखरीच रुग्णसंख्या आटोक्यात आणली आहे काय, याचा कोणीच विचार केलेला दिसत नाही. केवळ ‘कोरोना’ ला महामारी किंवा साथरोग घोषित करून अनागोंदी सुरु असल्याचा आरोप केला आहे. लॉकडाऊनमुळे जनता मृतवत झाल्याने तुम्हाला प्रशासन कसे चालवायचे, अशी गंभीर वेळ येईल. लोकांचा अंत पाहू नका आणि लोकांना कायदा हातात घ्यायला लावू नका, असा इशाराही निवेदनात दिलाय.









