गतवर्षाची सरासरी मागे टाकत दमदार वाटचाल : सर्वत्र पूरस्थिती
प्रतिनिधी / ओरोस:
गेले आठ दिवस कोसळणाऱया पावसाने उच्चांक गाठला आहे. गतवर्षीच्या तुलनेत जिल्हय़ात तब्बल 4060.16 मि. मी. अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान 11 जुलैपर्यंत जिल्हय़ात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच मालवण ते वसई आणि वेंगुर्ले ते वास्को या किनारपट्टी भागात अति उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. जनतेने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आले आहे.
गतवर्षी 7 जुलै रोजी जिल्हय़ात एकूण 37 दिवसात 8746.44 मि. मी. पाऊस झाला होता. या वर्षी याच कालावधीत 12806.6 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान मंगळवारी पडलेल्या पावसात कणकवली कुंभवडे मुख्य रस्ता ते गावठाणवाडी पूल, कुडाळ तालुक्यातील आंबेरी आणि निरुखे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी शेतात पाणी शिरल्याने पूर सदृश स्थिती निर्माण झाली होती. पडवे शिर्केवाडी ते रानबांबुळी रस्ता जोडण्यासाठी येथील ओढय़ावर बांधण्यात आलेल्या साकवाचा भराव वाहून गेला आहे.
मंगळवारी सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्हय़ात 37.6 मि. मी. च्या सरासरीने 300.8 मि. मी. पाऊस झाला. 1 जूनपासून आजपर्यंत 1600.825 मि. मी. च्या सरासरीने 12806.6 मि. मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत सावंतवाडी तालुक्मयात सर्वाधिक 52 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत मालवण तालुक्यात 2074 मि. मी. इतका सर्वाधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस देवगड तालुक्मयात 1 हजार 436 मि. मी. एवढा पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पाऊस
दोडामार्ग तालुक्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या 24 तासांत 33 मि. मी. तर आजपर्यंत एकूण 1506 मि. मी. सावंतवाडी 52 (1695), वेंगुर्ले 28.80 (1672.60), कुडाळ 44 (1453), मालवण 22 (2074), कणकवली 45 (1482), देवगड 30 (1436), वैभववाडी 46 (1488 मि. मी.) मि. मी. एवढा पाऊस झाला आहे.
13 लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले
शिवडाव, आडेली, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, सनमटेंब, पावशी, शिरवल, पुळास, हरकुळ, ओझरम, लोरे हे लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहेत. हरकुळ प्रकल्पातून सध्या 14.65 घ. मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.
प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्हय़ात 8 व 9 जुलै रोजी अति मुसळधार पाऊस, 10 जुलै रोजी मुसळधार पाऊस, तर 11 जुलै रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









