प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हयातून आतापर्यंत 119 स्वॅब नमुने कोरोनाबाबतच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 107 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून 11 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. या आधीच्या कोरोना रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून सध्या राजिवडा येथे नव्याने आढळलेला एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण जिह्यात आहे. राजिवडा लगतचा 3 किलोमीटरपर्यंतचा परिसर सिल करण्यात आला असून या भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. येथून जाण्या-येण्यासही पूर्ण बंदी घालण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बाहेरील जिल्हयातून आल्यामुळे होम क्वारंटाईनमध्ये 14 दिवसांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या 1002 झाली आहे. संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवलेल्या संशयितांची संख्या 392 इतकी झाली आहे. जिह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जिल्हयात अडकलेल्या परप्रांतातील 150 नागरिकांसाठी 53 निवारा गृहांमध्ये राहणे व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबरच 1506 जणांच्या भोजनाची व्यवस्था तहसिलदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक 532 जणांची व्यवस्था चिपळूणात असून संगमेश्वर व रत्नागिरीत अनुक्रमे 532 व 339 लोक आहेत.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदळाचे वाटप चालू महिन्याच्या शिधा वाटपानंतर होणार आहे. या सर्वांना 3 रुपये प्रतिकिलोप्रमाणे 25 किलो तांदूळ व 2 रुपये प्रति किलो प्रमाणे 10 किलो गहू (अंत्योदयसाठी) तर प्राधान्य कुटुंबासाठी प्रतिसदस्य 3 किलो तांदुळ 3 रुपये प्रति किलो व 2 किलो गहू 2 रुपये प्रतिकिलो धान्यवाटप सुरु आहे. हे धान्य ज्यांनी उचल केले आहे त्या सर्वांसाठी मोफत तांदुळ या आठवडयात उपलब्ध होणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत प्रधानमंत्री जनधन खाते असणाऱया महिलांना बँक खात्यावर 3 महिने प्रतिमाह 500 रुपये प्रमाणे वितरणाचे काम सुरु झाले आहे.
गेल्या 24 तासात रत्नागिरीत 2 गुन्हे दाखल झाले असून कारणाशिवाय रस्त्यावर वाहन आणल्याबद्दल 23 दुचाकी शहर वाहतूक शाखेने जप्त केल्या आहेत. प्रत्येक नागरिकाने शासनाकडून दिल्या जाणाऱया सूचनांचे पालन करून स्वत:सह आपले कुटुंब आणि समाजाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.









