मृतांची एकूण संख्या 45 : आणखी 47 पॉझिटिव्ह : नव्याने 264 जणांना डिस्चार्ज
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात रुग्ण वाढीबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. सोमवारी एकाच दिवशी कोरोनामुळे आणखी पाचजणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे सोमवारी एकाच दिवशी बरे झालेल्या 264 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्याने 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये सावंतवाडी येथील 42 वर्षीय तरुण आणि 65 वर्षीय व्यक्ती, खारेपाटण येथील 60 वर्षीय प्रौढ आणि कणकवली लोरे येथील 48 वर्षीय तरुण तसेच कुंभारमाठ-मालवण येथील 92 वर्षीय वृद्धेचा समावेश आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 1 हजार 444 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. सोमवारी 47 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तसेच 501 कोरोना नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 2 हजार 469 झाली आहे. सद्यस्थितीत कोरोना सक्रिय 980 रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 20278
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 2469
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 17308
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 501
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 980
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 45
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1444
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8323
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12513









