दोन दिवसांत मतदार यादी होणार जाहीर
प्रतिनिधी /बेळगाव
विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू झाली असून मंगळवार दि. 9 नोव्हेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. याकाळात सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
विधान परिषदचे मतदान दि. 10 डिसेंबर रोजी होणार आहे तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ग्राम पंचायत सदस्य, नगरपंचायत सदस्य, नगरपालिका सदस्य, नगरसेवक, खासदार, आमदार हे मतदार असून त्याबाबतची यादी येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 16 नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्यास मुभा राहणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत.
दि. 24 नोव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार असून 26 नोव्हेंबर रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. जिल्हय़ामधील विधान परिषदेच्या दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याबाबत जिल्हा प्रशासनाने सर्व ती तयारी सुरू केली आहे.
14 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याबाबतही अधिकाऱयांना सूचना करण्यात आली. सर्व ती तयारी लवकरात लवकर पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी यावेळी सांगितले. निवडणूक लढविण्यासाठी सामान्य उमेदवाराला 10 हजार रुपये, मागासवर्गीयांसाठी 5 हजार रुपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे.
कोरोनाचे नियम पाळतच होणार निवडणूक
कोरोनाचे नियम पाळत या निवडणुकीचे कामकाज केले जाणार आहे. याचबरोबर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी कोरोनाचे नियम पाळले पाहिजेत. अर्ज दाखल करताना, मतदानावेळी आणि मतमोजणीवेळी कोरोनाची मार्गसूची काटेकोरपणे पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्याचे सर्वांनीच पालन करायचे आहे.
मागीलवेळी 9 हजार 514 मतदारांनी बजावला हक्क
मागील निवडणुकीवेळी जिल्हय़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांनी निवडणुकीचा हक्क बजावला होता. एकूण 9 हजार 514 मतदारांनी हक्क बजावला होता. मात्र त्यामधील 406 मते बाद ठरली होती. निवडून आलेल्या सदस्यांनीच योग्यप्रकारे मतदान केले नसल्याचे दिसून आले होते. एकूण 9 हजार 496 मते ग्राहय़ ठरली होती.
15 स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपली
जिल्हय़ामध्ये एकूण 38 नगरपालिका व नगरपरिषद आहेत. त्यामधील 15 संस्थांची मुदत संपली आहे. त्यामुळे 23 स्वराज्य संस्थांमधील सदस्य या निवडणुकीसाठी पात्र ठरणार आहेत. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठय़ा प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदानापासून वंचित राहणार आहेत.
नगरसेवकांबाबत निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार
बेळगाव महापालिकेची निवडणूक झाली आहे. मात्र अद्याप महापौर, उपमहापौर निवडणूक झाली नाही. तसेच सभागृह अस्तित्वात नाही. त्यामुळे नूतन नगरसेवकांना निवडणुकीचा अधिकार आहे का? याबाबत विचारले असता मुख्य कार्यकारी निवडणूक अधिकाऱयांकडे पत्रव्यवहार केला आहे. दोन दिवसांत याबाबत उत्तर मिळेल. त्यानंतरच ते मतदान करू शकतात काय? हे स्पष्ट होणार असल्याचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले.









