सोमवारी 36.8 डिग्री सेल्सीयस तापमान
प्रतिनिधी/ रत्नागिरी
भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबईकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार 1 व 2 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हय़ात काही ठिकाणी विजांच्या गडगटाटासह व वादळी-वाऱयासह (प्रतितास 30-40 कि.मी.) पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आली होती परंतु भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून 1 नोव्हेंबर रोजी सोमवारी कमीत कमी 24.5 डिग्री सेल्सीयस पासून जास्तीत जास्त 36.8 डिग्री तापमान नमूद करण्यात आले आहे.
1 ते 5 नोव्हेंबर पर्यंत कमीत कमी तापमान 25 ते 26 डिग्री सेल्सीयस राहणार आहे. जास्तीत जास्त तापमान 35 ते 36 डिग्री सेल्सीयस असणार आहे. तसेच 1 ते 5 नोव्हेंबर पर्यंत दुपारी किंवा सायंकाळी पावसाचे वातावरण होणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून शेतकऱयांनी शेतीची काळजी घेण्याच आवाहनही करण्यात आले आहे. तयार भात, नागली, वरी पिकांची सकाळच्या वेळेस काढणी करून सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी पसरून ठेवावीत. आंबा बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी; पावसाची शक्यता असल्याने जमिनीमधील पाण्याचे प्रमाण लवकर कमी होऊन झाडाला ताण बसण्यास मदत होईल. गाई, म्हशी इत्यादी जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी पाण्याच्या ठिकाणापासून दूर बांधावीत, असा कृषी सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी विद्या विभागाकडून देण्यात आला आहे.









