दहावीचे 11 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण : अकरावीसाठी 14 हजार 640 प्रवेश क्षमता
पसंतीचे कॉलेज मिळण्याकडे विद्यार्थ्यांचा कल
स्वप्नील वरवडेकर / कणकवली:
‘कोरोना’ व ‘लॉकडाऊन’मुळे विलंब झालेला दहावीचा निकाल 29 जुलैला जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी जिल्हय़ात 11 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण होत 99 टक्के निकाल लागला. जिल्हय़ात 72 कनिष्ठ महाविद्यालये असून सर्वांची मिळून प्रवेश क्षमता 14 हजार 640 एवढी आहे. जिल्हय़ातील अनेक महाविद्यालयांमध्ये एमसीव्हीसी शाखाही आहेत. साहजिकच उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमताच अधिक असल्याने यावर्षीही दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना जिल्हय़ातीलच महाविद्यालयांमध्ये अकरावीचे शिक्षण घेणे शक्य आहे. मात्र आपल्या पसंतीच्याच शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रयत्न राहणार आहेत.
प्रतिवर्षाचा इतिहास बघता शास्त्र, वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असतो. अर्थात त्याला हे वर्षही अपवाद असण्याची शक्यता नाही. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. परिणामी अशा महाविद्यालयांमध्ये मोठय़ा संख्येने प्रवेश अर्ज दाखल होणार आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना मिळालेले भरघोस गुण लक्षात घेता, शहरांतील महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
गेल्या काही वर्षांत टक्क्यांची नव्वदी गाठणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढतच चालली आहे. यावेळीही ही आकडेवारी मोठीच आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा हा वाणिज्य व खास करून शास्त्र विभागाकडे असतो. परिणामी, शहरांतील महाविद्यालयांमध्ये 90 टक्क्याहून अधिक गुण असणाऱया विद्यार्थ्यांनाच शास्त्र विभागात प्रवेश मिळू शकेल, असाही अंदाज आहे. जिल्हय़ातील सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून कला विभागाच्या 3040, शास्त्र विभागाच्या 4080, वाणिज्य विभागाच्या चार हजार, तर कला-वाणिज्य संयुक्त 3520 जागा उपलब्ध आहेत.
प्रवेश क्षमताच अधिक
जि. प. माध्यमिक शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हय़ातील सर्व 72 कनिष्ठ महाविद्यालयांची मिळून प्रवेश क्षमता 14 हजार 640 आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या जागा 160 ने कमी झाल्या आहेत. जिल्हय़ातून 11 हजार 180 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील 11 हजार 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. साहजिकच उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षाही प्रवेश क्षमता 3 हजार 580 ने जास्त आहे. त्यातच जिल्हय़ात अनेक महाविद्यालयांमध्ये एमसीव्हीसी शाखा आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेश नक्की आहे. फक्त मालवण व वेंगुर्ले तालुक्यात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
14 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया
14, 17, 18, 19 ऑगस्ट या चार दिवसांत महाविद्यालयांतर्फे अकरावी प्रवेशाचे अर्ज देण्यात व स्वीकारण्यात येतील. 20, 21 व 24 ऑगस्ट या तीन दिवसांत प्रवेश अर्जांची छाननी, तपासणी, गुणवत्तेनुसार निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. ही निवड यादी व प्रतीक्षा यादी 25 ऑगस्टला दुपारी 3 वाजेपर्यंत प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात येईल. 26, 28, 29 व 31 ऑगस्ट या चार दिवसांत निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही जागा शिल्लक राहिल्यास 2 व 3 सप्टेंबर दोन दिवसांत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही जागा शिल्लक राहिल्यास 4 व 5 सप्टेंबर या दोन दिवसात दुसऱया प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश देण्यात येणार आहे. त्यातूनही रिक्त राहिलेल्या जागांवर 7 व 8 सप्टेंबरला एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तर अकरावीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे.
उपसंचालकांच्या शिक्षणाधिकाऱयांना सूचना
प्रवेशाच्या अनुषंगाने प्रतिवर्षी जिल्हय़ातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडते. पण, ‘कोरोना’च्या संकटामुळे ही बैठक यावेळी अद्याप होऊ शकलेली नाही. मात्र, प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. यात, सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परिस्थितीमधील सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. म्हणूनच प्रवेश प्रक्रियेसाठी शक्य असल्यास कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर ऑनलाईन पद्धतीचा वापर करणे सोयीस्कर होईल, यादृष्टीने नियोजन करावे. पण, जेथे ऑनलाईन पद्धतीने प्रवेश शक्य नाही, तेथे ‘सोशल डिस्टन्सिंग’ व शासनाने ‘कोरोना’बाबत घालून दिलेले निकष पाळून टप्प्या-टप्प्याने विद्यार्थ्यांना बोलावून प्रवेश प्रक्रिया पार पाडावी. प्रवेश प्रक्रियेवेळी महाविद्यालयांमध्ये गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
तालुका उत्तीर्ण विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालये प्रवेश क्षमता
देवगड 1689 10 2120
दोडामार्ग 416 3 480
कणकवली 1828 13 2800
कुडाळ 2099 13 2760
मालवण 1345 10 1320
सावंतवाडी 2175 13 2920
वैभववाडी 586 6 1320
वेंगुर्ले 922 4 920
एकूण 11060 72 14640