लोटे, खेर्डी, गाणे-खडपोलीतील कारखान्यांचा समावेश,
प्रतिनिधी/ चिपळूण
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गर्दी टाळण्यासाठी जिल्हय़ातील औद्योगिक वसाहतीतील उद्योग बंद करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आता हळूहळू त्यातील काही कारखान्यांना एमआयडीसीने उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिली आहे. उत्तर रत्नागिरीतील लोटे, खेर्डी आणि गाणेखडपोली या प्रमुख औद्योगिक वसाहतीतील 30 कारखान्यांचा यात समावेश आहे. मात्र परवानगी मिळूनही कामगारच येत नसल्याने त्यातील काहीच कारखान्यांमध्ये उत्पादन सुरू झाले आहे.
कोरोनामुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाची लागण झालेल्या युरोपिय देशांमध्ये येथील बहुतांशी उद्योगांमधील उत्पादन निर्यात केले जाते. आयात-निर्यात बंद असल्याने त्याचा परिणाम जिल्हय़ातील उद्योगांवर झाला आहे. बहुतांशी उत्पादन पडून राहिलेले आहे. कोरोनाच्या भीतीने कामगारांची संख्याही घटली होती. संचारबंदीनंतर गर्दी टाळण्यासाठी उद्योगांना उत्पादन बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र औषधे व त्याला आवश्यक असणारे उत्पादन काढणाऱया कंपन्यांनी कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी अर्ज केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्हय़ातील लोटे, मिरजोळी, गाणेखडपोली, खेर्डी एमआयडीसीतील उद्योगांना कमीत कमी कामगार वापरून उत्पादन सुरू करण्यास परवानगी एमआयडीसीने दिली आहे. उद्योगांनी ऑनलाईन अर्ज करत उत्पादन सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱयांकडे मागितल्यानंतर एमआयडीसीकडून अहवाल मागवण्यात आला. त्यानुसार या कारखान्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.
दरम्यान, परवानगी मिळाली असली तरी बहुतांशी उद्योगांनी आपले उत्पादन सुरू केलेले नाही. कोरोनाच्या भीतीने व गावबंदीमुळे कामगार घराबाहेर पडत नाहीत. परिणामी कामगारच येत नसल्याने उद्योग सुरू करता येत नाहीत. काहीनी तीन शिफ्टमध्ये चालणारे कामकाज एका शिफ्टवर आणले आहे. प्रशासकीय विभागातील कार्मचाऱयांना सुट्टय़ाच देण्यात आलेल्या आहेत.
उत्पादन परवानगीवर शंका
मुळातच असंख्य उद्योगांमध्ये एमआयडीसीने नेमक्याच उद्योगांना उत्पादन करण्यास परवानगी दिली असली तरी त्यावरून उद्योगांमध्ये नाराजी आहे. लॉकडाऊनमध्ये औषधे बनवणाऱया उद्योगांसह काही महत्वपूर्ण उद्योगांना परवानगी योग्य असली तरी ज्याचा औषधांशी अथवा रसायनाशी संबंध नाही अशा उद्योगांनाही परवानगी मिळाल्याने शंका उपस्थित केली जात आहे. मात्र काही उद्योगांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत आपले उत्पादन बंद ठेवले आहे.









