पुन्हा लॉकडाऊन की सीलडाऊन आज होणार निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातून प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या 199 संशयितांच्या स्वॅब नमुन्याचा तपासणी अहवाल उपलब्ध झाला असून त्यामध्ये 183 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला आणखी सहा अहवालांची प्रतीक्षा असून आतापर्यंत बेळगाव व रायबाग तालुक्मयातील दहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हा सर्वेक्षण विभागाने शुक्रवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सद्यःस्थितीची माहिती देण्यात आली आहे. जिल्हय़ात एकूण 1500 जणांच्या आरोग्यावर नजर ठेवण्यात आली आहे. यापैकी 310 जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून चौदा जणांना इस्पितळातील विलगीकरण विभागात ठेवण्यात आले आहे. 589 जणांनी चौदा दिवसांचा तर 587 जणांनी 28 दिवसांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असून आतापर्यंत आरोग्य विभागाच्यावतीने एकूण 199 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी दहा जणांचे पॉझिटिव्ह तर 183 जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी सहा जणांचे अहवाल अद्याप यायचे आहेत.
बेळगावात स्वॅब तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी
दरम्यान, बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी बेळगावात स्वॅब तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळाच्या (आयसीएमआर) प्रादेशिक वैद्यकीय संशोधन लॅबमध्ये तात्पुरत्या तपासणीसाठी परवानगीची मागणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी बेंगळूर किंवा शिमोग्याला पाठविण्यात येत होते. आता हुबळीत प्रयोगशाळा सुरू झाल्याने बेळगाव येथील संशयितांची स्वॅब तपासणी लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी बिम्स प्रशासनाने तयारी केली असून प्रशासकीय इमारतीवर असलेला वैद्यकीय विभाग रुग्णांच्या उपचारासाठी राखून ठेवण्यात आला आहे.
कोरोना थोपविण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. अनेक जण लॉकडाऊनच्या काळात अनावश्यकपणे फिरताना दिसत आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की कोरोनाचा फैलाव ज्या ज्या जिल्हय़ात झपाटय़ाने होत आहे त्या हॉटस्पॉटमध्ये सीलडाऊनचा निर्णय घ्यायचा, हे शनिवारी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. त्यानंतर यासंबंधीचा निर्णय जाहीर होणार आहे.
निवांत घरात रहा नाहीतर… ( – सीमा लाटकर)

शुक्रवारी लॉकडाऊनचे नियम बेळगावात आणखी काटेकोरपणे राबविण्यात आले. पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे करून अनावश्यकपणे येणारी वाहने अडवून ती परतावून लावत होते. नागरिकांनी निवांतपणे आपापल्या घरी रहावे. त्यामुळे कोरोना थोपविण्यासाठी मदत होणार आहे. नहून अनावश्यकपणे फिरणाऱयांना कारागृहात पाठविण्याची व्यवस्था आपण करू, असा निर्वाणीचा इशारा कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी दिला आहे.
108 वाहने जप्त
शुक्रवारी दिवसभरात शहर व उपनगरांमध्ये लॉकडाऊनच्या काळात अनावश्यकपणे फिरणारी 108 वाहने जप्त करण्यात आली आहेत. गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेश्वर जिद्दी यांनी शुक्रवारी सायंकाळी ही माहिती दिली आहे. यामध्ये 107 दुचाकी व एका कारचा समावेश आहे.









