जि.प.आरोग्य अधिकारी डॉ. बबित कमलापूरकर : रुग्णांना केले आवश्यक औषधोपचार साहित्य वाटप
प्रतिनिधी / रत्नागिरी
हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गंत नियंत्रण कार्यक्रम राबविला जात आहे. त्यानुसार जिल्हा आरोग्य यंत्रणाही प्रभावीपणे काम करत असल्याने या आजाराचे प्रमाण अत्यल्प आहे. आज रत्नागिरी जिल्हय़ात हत्तीरोगाचे जुने 48 रुग्ण आहेत. त्यांना आवश्यक औषधोपचारासाठी रुग्णांची जिल्हा आरोग्य विभागस्तरावरून उपचार साहित्य प्रदान करत विशेष खबदारी घेतली जात आहे.
हत्तीरोग जंतूंचा प्रामुख्याने डासामार्फत प्रसार होतो. क्युलेक्स डासांच्या मादीने चावा घेतल्यास हा जंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. त्यानंतर पुढील दीड वर्षानंतर या रोगाची लक्षणे दिसू लागतात. त्यात मुख्यत्वे हात व पायास सूज, तसेच बाहय़ जननेंद्रयावर सूज व हायड्रोसील सारखी लक्षणे दिसून येतात. हत्तीरोगाचा प्रसार टाळण्यासाठी क्युलेक्स डासापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्यासाठी परिसर स्वच्छता, सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट, गप्पीमासे पाळणे इत्यादी उपाययोजना करणे आवश्यक आहे. हत्तीपाय झालेल्या रुग्णांनी पायाची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकसहभागातून हत्तीरोग निर्मूलन करणे शक्य आहे. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा नजीकच्या आरोग्य संस्थेत जाऊन तपासणी करून घ्यावी. वेळेत निदान झाल्यास हा रोग्य पूर्ण बरा होऊ शकतो. राज्यात विविध जिल्हय़ात हत्तीरोगाचे रुग्ण आढळून येतात. कोकणातही या रोगाचे रुग्ण आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ात 48 जुने हत्तीपाय रुग्ण असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. या रुग्णांना राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गंत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एस.वाय यादव यांच्याहस्ते नुकतेच मार्बिडिटी मॅनेजमेंट कीट वाटप करण्यात आले. त्यावेळी जिल्हय़ातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा हिवताप कार्यालय आरोग्य पर्यवेक्षक एल.जी.पुजारी उपस्थित होते. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरून जिल्हय़ातील इतर हत्तीरोग असणाऱयांना या कीटचे वाटप केले जाणार आहे. या कीटमध्ये पाय धुणेकरता टब व मग, जखमांची काळजी घेण्याकरता पावडर, मलम तसेच इतर औषधी साहित्य देण्यात आले.









