बुधवारी 120 नवे रुग्ण, पाच जण दगावले
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात सक्रिय रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली आहे. गेल्या आठवडय़ात 1700 च्या घरात असलेली सक्रिय रुग्णसंख्या बुधवारी 2000 च्या घरात पोहोचली आहे. बुधवारी कोरोनाचे 120 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 63 जण बरे झाले आहेत. जिल्हय़ातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
एकूण बाधितांचा आकडा 76 हजार 524 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 73 हजार 805 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. खानापूर तालुक्मयातील दोन, अथणी, हुक्केरी व बेळगाव तालुक्मयातील प्रत्येकी एक असे पाच जण दगावले आहेत. मृतांचा सरकारी आकडा 807 वर पोहोचला आहे. अद्याप 2 हजार 275 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. आतापर्यंत जिल्हय़ातील 9 लाख 73 हजार 758 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 8 लाख 93 हजार 676 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 47 हजार 751 जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.
बुधवारी गणेशपूर, मच्छे, हिंडलगा, कंग्राळी खुर्द, अयोध्यानगर, आझाद गल्ली, भाग्यनगर, चंद्रमौळी कॉलनी, चन्नम्मानगर, कॉलेज रोड, एसपीएम रोड, कामत गल्ली, कंग्राळ गल्ली, लक्ष्मी टेकडी, माळी गल्ली, नानावाडी, गांधीनगर, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, सैनिकनगर, शाहूनगर, शिवबसवनगर, वैभवनगर, वीरभद्रनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी बेळगावपेक्षा चिकोडी तालुक्मयात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे.









