वार्ताहर/ मार्गताम्हाने
गेल्यावर्षी उन्हाळ्यात रत्नागिरी जिह्यातील टंचाईग्रस्त गावांना जेवढय़ा प्रमाणात टँकरद्वारे पाणी पाठवले जात होते, त्या क्षमतेच्या दुप्पट टँकरने पाणी त्या गावांना पुरवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी कोकण आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई व तेथे टँकरद्वारे होणारा पाणी पुरवठा अशा वाडय़ांची संख्या ठरलेली असते. त्याप्रमाणे प्रशासनाचे नियोजन होऊन कामकाजही सुरु असते. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य नागरिक दिवसातून अनेकवेळा स्वच्छ हात धुतात. सर्व काळजी घेण्यापोटी दिवसातून दोनवेळा आंघोळही करतात. तसेच संपर्कातील ठिकाणी व अन्य ठिकाणी साबणाने हात धुणे व फवारणी करणे यासाठी पाण्याचा वापर अधिक प्रमाणात होत आहे.
प्रत्येक गाव व त्यातील वाडीमध्ये कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक पुणे, मुंबई व अन्य शहरातून गावागावांमध्ये आले आहेत. त्यामुळे अनेक वाडय़ा व गावांची लोकसंख्याही वाढलेली आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करुन तातडीने 31 मे ते 15 जून किंवा पाऊस पडेपर्यंत गेल्यावर्षी वाडय़ांसाठी जेवढय़ा लिटर पाण्याचा पुरवठा केला जात होता, त्या क्षमतेच्या दुप्पट लिटर पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे वाडय़ा-वस्त्यांना तातडीने पुरवण्यात यावा, अशा मागणीचे पत्र डॉ. नातू यांनी कोकण आयुक्तांना पाठवले आहे.









