अवघे दोन महिने समर्पित भावनेतून पूर्णवेळ सेवेची आहे अपेक्षा : जिल्हय़ाचा वाढता मृत्यूदर तेच रोखू शकतात
- चला, महाराष्ट्रासमोर नवा आदर्श उभा करु!
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्गातील कोरोना मृत्यूचा दर कमी करण्यासाठी जिल्हय़ात खासगी सेवा देणाऱया हृदयरोग तज्ञ व भूलतज्ञांनी जिल्हा कोविड रुग्णालयात समर्पित भावनेतून सेवा देण्याची वेळ आता आली आहे. जिल्हय़ातील या तज्ञ डॉक्टरनी अवघ्या दोन महिन्यांसाठी पूर्णवेळ सेवा दिली, तर मृत्यूची साखळी निश्चितपणे तुटू शकते. अशा पद्धतीने मुंबईप्रमाणे सिंधुदुर्गदेखील साऱया महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श घालून देऊ शकतो. कोरोनाच्या या वरवंटय़ाखाली भरडल्या जाणाऱया तमाम सिंधुदुर्गवासीयांच्यावतीने जिल्हय़ातील या तज्ञ डॉक्टरना ही साद घालत आहोत.
पुरेसे डॉक्टर, पुरेसे कर्मचारी वा पुरेशी वैद्यकीय सामुग्री उपलब्ध नसतानाही जिल्हा कोविड रुग्णालयातील यंत्रणा कोविड रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी जी धडपड करीत आहे, त्याला सॅल्यूट ठोकावाच लागेल. परंतु, कितीही झाले तरी तज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे या यंत्रणेचे हात तोकडे पडत आहेत. ‘डेथ रेट’ वाढल्याने चिंता अधिक वाढली आहे. मृत्यूदराच्या बाबतीत आपण राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचलो, ही बाब आपल्या सिंधुदुर्गला शोभादायक नाही. अलिकडे तब्बल 32 एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी या जिल्हय़ाला प्राप्त झाले. त्यामुळे दमून गेलेल्या वैद्यकीय यंत्रणेला हत्तीचे बळ प्राप्त झाले. मात्र, तरी देखील या बदललेल्या कोरोनावर मात करायची असल्यास तज्ञ हृदयरोगतज्ञ व भुलतज्ञांची नितांत गरज आहे. त्यासाठीच तमाम सिंधुदुर्गवासीयांच्यावतीने जिल्हय़ात खासगी प्रॅक्टीस करणाऱया तज्ञ फिजिशियन्सना ही हाक देत आहोत.
समर्पित भावनेतून हवी आहे पूर्णवेळ सेवा
खरं तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने जिल्हय़ातील काही फिजिशियन जिल्हा कोविड रुग्णालयासाठी किंवा जिल्हय़ातील अन्य शासकीय कोविड सेंटर्ससाठी सेवा देत आहेत. परंतु, एक-दोन तास सेवा देऊन एवढय़ा मोठय़ा संकटावर मात करणे फारच कठीण आहे. दिवसातून किमान आठ ते दहा तास या डॉक्टरनी सेवा दिली, तर सध्याचे हे चित्र निश्चितपणे बदलू शकते. जास्त काळ नको. या डॉक्टरनी किमान दोन महिन्यांसाठी तरी ही सेवा द्यावी, अशी तमाम जिल्हावासीयांच्यावतीने त्यांना जाहीर विनंती करीत आहोत. सर्वांनी एकत्र होऊन हे आव्हान पेलले, तर कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी होऊच. पण, त्याचबरोबर साऱया महाराष्ट्रात आपण एक नवा आदर्श घालून देऊ…!
डॉ. कोटणीस यांचा आदर्श समोर ठेवा!
आपल्याच सिंधुदुर्गच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी अशाच समर्पित भावनेतून चीनला सेवा दिली आणि ते अमर झाले. आपणास तर याच जिल्हय़ातील आपल्या बांधवांसाठी सेवा द्यायची आहे. डॉ. कोटणीस यांच्या जिल्हय़ातील आपण सर्व डॉक्टर आहात. त्यांचा आदर्श आपणास पुढे न्यायचा असेल, तर या सर्व तज्ञ फिजिशियन्सनी कुणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या जनतेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तातडीने पुढे येण्याची गरज आहे.
चला मृत्यूची साखळी तोडूया!
जिल्हय़ातील या कोविड संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या जिल्हय़ाला पुरेसा निधी आणि जिल्हाधिकाऱयांना सर्वाधिकार दिले आहेत. या अधिकाराचा वापर करीत जिल्हा कोविड रुग्णालयासाठी परिपूर्ण सेवा देण्यासाठी पुढे येणाऱया खासगी फिजिशियन्स व भुलतज्ञांसाठी समाधानकारक मानधनाची तरतूद करता येत असेल, तर पाहवे. जिल्हय़ातील पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी या डॉक्टरांची सेवा मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे वाटते. पण, त्याही पुढे जाऊन आम्ही तमाम सिंधुदुर्गवासीयांच्यावतीने जिल्हय़ातील या हृदयरोगतज्ञांना आणि भूलतज्ञांना आवाहन करतो की, तुम्ही कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहू नका किंवा मानधनावर अडू नका. तुमच्या या सेवेची जिल्हय़ातील जनतेला खूप गरज आहे. तेव्हा चला, हे आव्हान समर्थपणे पेलून मृत्यूची साखळी तोडूया व महाराष्ट्रासमोर नवा आदर्श घालून देऊया.
स्वयंस्फूर्तीने पुढे या..!
सिंधुदुर्गात खासगी प्रॅक्टिस करणारे एकूण 15 फिजिशियन व 11 भुलतज्ञ आहेत. या फिजिशियनमध्ये मालवण येथील डॉ. विवेक रेडकर, डॉ. अविनाश झाटये, डॉ. मालविका झांटये, कुडाळ येथील डॉ. रमेश परब, डॉ. संजय आकेरकर, डॉ. जी. टी. राणे, डॉ. प्रशांत कोलते, सावंतवाडी येथील डॉ. शंतनू तेंडुलकर, डॉ. निर्मला सावंत, कणकवली येथील डॉ. सूर्यकांत तायशेटे, डॉ. धनश्री तायशेटे, डॉ. मोहन म्हैसकर, डॉ. धनेश म्हैसकर, डॉ. बाळासाहेब शेळके, डॉ. विवेक रेवडेकर आदींचा समावेश आहे, तर सिंधुदुर्गातील भूलतज्ञांमध्ये कणकवली येथील डॉ. मुक्तानंद गवंडळकर, डॉ. पराग निगॉनकर, डॉ. हेमा तायशेटे, डॉ. स्मिता बिरमोळे, डॉ. किर्ती नागवेकर, मालवण येथील डॉ. लीना लिमये, कुडाळ येथील डॉ. वेदिराज सौदत्ती, डॉ. श्रुती सामंत, डॉ. स्मिता पंडित, सावंतवाडी येथील डॉ. क्षमा देशपांडे व डॉ. जी. ए. सुर्यवंशी आदींचा समावेश आहे. या सर्व तज्ञ डॉक्टरना सिंधुदुर्गवासीयांच्यावतीने कळकळीची विनंती आहे की, त्यांनी तातडीने दोन महिन्यांसाठी पूर्णवेळ सेवा देण्याकरिता स्वयंस्फूर्तीने पुढे यावे. आपली सर्वांची या सिंधुदुर्गाला गरज आहे.









