जिल्हाधिकारी, जि.पं.सीईओ, जिल्हा पोलीसप्रमुखांनी घेतली लस : लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू
प्रतिनिधी / बेळगाव

जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्यासह जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. आणि जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये को-व्हॅक्सीन लस घेतली आहे. ही लस नियमानुसार सर्वांनी घ्यावी. ही लस सुरक्षित असून या लसीपासून कोणतेही विपरित परिणाम होणार नाहीत, असे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.
सरकारने ही लस घेण्यासाठी आता जनजागृती केली आहे. सरकारने या लसीसाठी एक मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार हा लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. आता सर्वांनीच ही लस घ्यावी आणि सहकार्य करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. सध्या पोलीस, अंगणवाडी कार्यकर्त्या, आरोग्य विभाग कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. 81 हजार 82 जणांना ही लस देण्यात आली आहे.
कोरोना टाळण्यासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत या लसीमुळे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झाले नाहीत. कुणालाही लस दिल्यानंतर काही त्रास झालाच तर तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा लसीकरण केंद्रात संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले असून 1 मार्चपासून दुसऱया टप्प्याच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 60 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींना ही लस देण्यात येत आहे. याचबरोबर रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग असणाऱयांनाही लस दिली जाणार आहे.
शहरातील जनतेला तसेच उपनगरांतील जनतेला सिव्हिल हॉस्पिटल तसेच त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस देण्यात येत आहे. सध्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत लस दिली जात आहे. याचबरोबर खासगी रुग्णालयात लस देण्यात येत आहे. मात्र, त्या ठिकाणी 250 रुपये आकारण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले.
कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिह्यातील मंदिरे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. याचबरोबर सण, समारंभ, यात्रा यांच्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. जनतेने गर्दीच्या ठिकाणी जायचे टाळावे तसेच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर प्रत्येकाने आवर्जुन करावा, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.









