प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिह्यात उत्तम काम सुरू आहे. जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या चारही कोरोना रूग्णांचे नवे अहवाल निगेटीव्ह आले असून पुढील अहवालही निगेटीव्हच येतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल असा विश्वास पालकमंत्री ऍड. अनिल परब यांनी व्यक्त केली. नागरिकांनाही योग्य ती काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिह्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री परब यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खासदार विनायक राऊत, आमदार हुस्नबानू खलिफे, राजन साळवी, भास्कर जाधव, शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. गुहागर-मंडणगडचे आमदार योगेश कदम व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे यात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिह्यातील कोरोना स्थिती व उपाययोजनांबाबतची तर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर माहिती यावेळी सादर केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी ग्राम कृती दल तसेच ग्रामीण भागात असलेल्या आरोग्य सुविधा याबाबत माहिती दिली. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी वैद्यकिय व्यवस्था व रूग्ण संख्येबाबतची माहिती दिली.
रूग्णांच्या दुसऱया अहवालाची प्रतीक्षा
आढावा बैठकीनंतर दुपारी दिड वाजता पत्रकारपरिषद झाली. यावेळी परब यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य व प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजना व कामाचे कौतुक केले. जिह्यात आतापर्यंत 6 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एक रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. इतर चार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यांचे नवे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले असून चारही जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. पुढील अहवालांची प्रतीक्षा असून तेही निगेटीव्ह येतील व जिल्हा कोरोनामुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वॅब तपासणी पुन्हा पुण्यातच
जिह्यातून स्वॅब तपासणी नमुने सध्या मिरज येथे पाठवले जात आहेत. त्याठिकाणी कर्मचारी संख्या व तपासणी क्षमता कमी असल्याने अहवाल येण्यास विलंब होत आहे. यामुळे यापुढील नमुने पुर्वीप्रमाणे पुणे येथील प्रयोगशाळेतच पाठवले जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री परब यांनी यावेळी केली.
केशरी कार्डवर धान्य पुढील महिन्यात
केशरी कार्डधारकांना मर्यादा वाढवून धान्य सवलतीच्या दरात देण्याचा निर्णय झाला आहे. मात्र हे धान्य मे महिन्यापासून मिळणार आहे. याबाबतचा स्पष्ट सूचना लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून गैरसमज अथवा गोंधळ होणार नाही असे पालकमंत्री म्हणाले.
9 हजार लोकांना रेशन पोर्टेबिलिटी लाभ
मुंबई वा अन्य जिल्हय़ांमध्ये रेशनकार्ड असलेले अनेकजण जिह्यात अडकून पडले आहेत, अशा सर्वांना रेशन पोर्टेबिलिटीचा लाभ दिला जात आहे. असा लाभ घेणायांची संख्या 9 हजार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवभोजन केंद्र वाढणार
सध्या जिह्यात 13 ठिकाणी शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून 1250 थाळयांची व्यवस्था आहे. या केंद्रांची संख्या वाढविण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना असून त्यांनी केंद्र संख्या वाढवणे व संध्याकाळ भोजनाचे नियोजन याबाबत योग्य निर्णय घ्यावेत अशा सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
पंचनामे तातडीने करा
कोरोनाचे संकट एका बाजूला सुरू असतानाच अवकाळी पावसाने चिपळूण व गुहागर तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. यातील बाधित व्यक्तींना मदत देण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
सवलती मिळणार पण जिल्हाबंदी कायम
20 एप्रिलनंतर जिल्हय़ात उद्योग व्यवसायांसह काही क्षेत्रांमध्ये काही प्रमाणात सूट मिळणार असली तरी सीमा बंदी कायम राहणार आहे. या स्थितीत जिह्यातील कामगारांच्या मदतीने तातडीची रस्ते, इमारती, पूल आणि घर दुरुस्तीचे काम पूर्ण करून घ्या असेही ते म्हणाले. यासाठी स्थानिक मजुरांचा वापर करावा. अत्यावश्यक असल्यासच जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीने हद्दीबाहेरच्या मजुरांचा विचार करावा अशा सूचना परब यांनी दिल्या.
वाशी मार्केट बंद असल्याने कोकणातील आंबा विक्रीसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र सोमवारपासून या मार्केटमध्ये आंबा व्यवहार सुरू होणार असल्याने यावर तोडगा निघाला आहे. पणन महामंडळाच्या माध्यमातूनही आंब्याला नवीन बाजारपेठ मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
उदय सामंत यांचे कौतुक
गेले काही दिवस आजारपणामुळे जिल्हय़ात येता आले नाही. आपल्या आजारपणाच्या काळात उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून उत्तम काम केल़े कोरोना नियंत्रणासाठी प्रशासकीय यंत्रणांचा आढावा घेऊन शासन सामान्यांसाठी कार्यरत ठेवण्याचे काम त्यांनी खूपच चांगल्या पद्धतीने पार पाडले अशा शब्दात पालकमंत्री परब यांनी सामंत यांचे कौतुक केल़े
अद्याप 44 अहवाल प्रलंबीत
जिल्हातून आजपर्यंत एकूण 404 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 352 अहवाल निगेटीव्ह असून 6 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. 2 नमुने नाकारण्यात आले असून आणखी 44 अहवालांची प्रतीक्षा असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. शुक्रवार सायंकाळपर्यंत 312 अहवाल निगेटीव्ह आले होते. शनिवार सांयकाळपर्यंत त्यात 40 ची भर पडून निगेटीव्ह अहवालांची संख्या 352 झाली आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.









