जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांचे निर्देश
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्य़ात एकल वापर प्लास्टिकच्या वापरातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी येत्या 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात येणार आहे. एकल वापर प्लास्टीकची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे गुरूवारी एकल प्लास्टिक वापराबाबत जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. एकल वापर होणाऱया प्लास्टिकच्या विविध वस्तूंऐवजी निसर्गपुरक इतर अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने कापडी पिशव्या, बांबु, लाकडी वस्तू, सिरामिक आदी चांगले पर्याय आहेत. नागरिकांनी अशा निर्सगपुरक वस्तूंचा वापर अधिकाधिक करावा, असे आवाहन डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी केले.
प्लास्टिकच्या वस्तूंपासून पर्यावरणाला अधिक धोका संभवू नये, यासाठी पुनर्प्रक्रिया करण्यावर भर द्यावा, असेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, मुख्यालय प्लास्टिक सेल, नंदकुमार गुरव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरचे प्रादेशिक अधिकारी जे. एस. साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता राक्षे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चिपळूणचे उपप्रादेशिक अधिकारी सागर औटी, क्षेत्रीय अधिकारी अमित लाटे तसेच सर्व नगर पालिका, नगर पंचायतींचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.
1 जुलैपासून बंदी घालण्यात येणाऱया एकल वापर प्लास्टीक वस्तूः
सजावटीसाठी वापरले जाणारे प्लास्टिक व थर्माकॉल, मिठाईचे बॉक्स, निमंत्रण कार्ड, सिगारेट पाकिटावर आवरण म्हणून वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक कान कोरणे, प्लास्टिक काडय़ा, प्लास्टिक झेंडे, पॅन्डी, आईक्रीम कांडय़ा, प्लास्टिक प्लेटस, कप ग्लासेस इ.
कठोर कारवाईची तरतूद
महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार 500 रूपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर 5 हजार रूपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱयांदा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास 10 हजार रूपये दंड आकारला जाईल. तिसऱयां वेळी 25 हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा कारावास असेल.
– डॉ. बी. एन. पाटील,
जिल्हाधिकारी, रत्नागिरी









