प्रतिनिधी / सातारा :
घरकुलाचे पात्र लाभार्थी नेमकेपणाने शोधण्यासाठी आणि कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जिल्ह्यात 87 हजार 257 कुटुंबांची सर्व्हेद्वारे पडताळणी करण्यात येणार आहे. आवास प्लस अंतर्गत पात्र कुटुंबांना घरकुल मिळण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या महत्त्वाकांक्षी सर्व्हेसाठी प्रगणक नेमून स्थळभेटीद्वारे घर निकषानुसार पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जी सी, प्रकल्प संचालक सुषमा देसाई उपस्थित होत्या.
जिल्ह्यात 1 लाख 18 हजार 101 कुटुंबांनी घरकुलासाठी आवास प्लस अंतर्गत नोंद केली होती. त्यातील विविध घर निकषानुसार प्रणाली द्वारे अपात्र कुटुंबे वगळून प्राधान्यक्रम (जीपीएल) कुटुंबांची संख्या 87 हजार 257 उपलब्ध झाली आहे. या कुटुंबांचा व्यवस्थित सर्वे म्हणजेच स्थळ पडताळणी होणे गरजेचे आहे जेणेकरून योग्य आणि पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळेल. यासाठी प्रगणक नेमण्यात येणार आहेत. मुख्यतः ग्रामसेवक तलाठी शाखा अभियंता यांची नेमणूक करण्यात येणार असून तालुका स्तरावरुन शाखा अभियंता अंगणवाडी पर्यवेक्षिका शेती अधिकारी तसेच आवश्यक असल्यास इतर विभागातील कर्मचायांची नेमणूक पर्यवेक्षक म्हणून करण्यात येणार आहे. ग्रामसेवक किमान दीडशे कुटुंबे पाहणार आहेत तर पर्यवेक्षक यापैकी 20 टक्के कुटुंबांची पाहणी प्रत्यक्ष करतील. गटविकास अधिकारी आणि सहाय्यक गटविकास अधिकारी अनुक्रमे एक आणि दोन टक्के कुटुंबांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. गाव स्तरावरील आवास प्लस च्या स्थळ पडताळणीच्या पात्र व अपात्र बाबत काही तक्रारी तालुका स्तरावर लेखी प्राप्त झालेस त्याचे निवारण गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने करावयाचे आहे. प्रगणक कुटुंबाची स्थळ पडताळणी करताना संबंधित कुटुंब जिथे निवास करत आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पडताळणी करणार आहेत. तक्रारीला वाव राहणार नाही आणि संपुर्ण स्थळ पडताळणी मध्ये पारदर्शकता येईल याबाबत विविध स्तरावर कार्यशाळा होणार असून नेमकेपणाने सर्वे होईल याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात येत आहे असे कबुले यांनी सांगितले.









