अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 11 जून 2021. दुपारी 12.40
●दुसरी लाट थोपवून प्रशासन तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीत ●चार तालुक्यामध्ये रुग्ण वाढ जास्त ●कराडला जंबो कोविड हॉस्पिटलसाठी जागेची पाहणी ●जिल्हाधिकाऱ्यांच्या विविध तालुक्यांना भेटी
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात गुरुवारी रात्रीच्या अहवालात 751 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेले चार ते पाच दिवस रुग्णवाढ आठशेच्या दरम्यान स्थिर आहे. रुग्ण वाढ कमी होऊ लागल्याने प्रशासन आता तिसरी लाट थोपवण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. कराडला जम्बो हॉस्पिटलसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केली आहे. बेड वाढवण्यासाठी ते सर्व तालुक्यांना भेटी देत आहेत.
तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्जता
सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत प्रामुख्याने लहान मुलांना संसर्ग होण्याची तसेच दुसऱया लाटेपेक्षा एकूण रूग्णप्रमाण जास्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह संपूर्ण प्रशासन तिसऱया लाटेच्या तयारीला लागले आहे. प्रमुख शहरांसह कोरोना सेंटरमधील बेडची क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
कराडला जम्बो कोविड आणि लहान मुलांसाठी हॉस्पिटल
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काल कराडला भेट देऊन शहरातील पाच जागांची पाहणी केली. तिसऱया लाटेसाठी शहरात जम्बो कोविड सेंटर आणि लहान मुलांचे 150 बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. यासाठी सुपर मार्केटमधील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलला त्यांनी अनुकूलता दर्शवली आहे.
चार तालुक्यात रूग्णवाढ कमी व्हावी
जिल्हय़ात संसर्ग कमी होत असला तरी चार तालुक्यांमधील रूग्णप्रमाण आटोक्यात राहणे आवश्यक आहे. 1 ते 10 जून दरम्यान, सातारा 2209, खटाव 1770, कराड 2076, फलटण 1354 रूग्ण वाढले आहेत. मृत्यूचे प्रमाण साताऱयात जास्त असून 10 दिवसात 90 मृत्यू झाले आहेत.
शुक्रवारी जिल्हय़ात एकूण बाधित 751
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने -889182, एकूण बाधित – 178232, घरी सोडलेले – 163439, मृत्यू -3968, उपचारार्थ रुग्ण-11525









