अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 2 जानेवारी 2022, सकाळी 11.30
● शनिवारी दिवसभरात 2776 जणांची स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हीटी 2.34 टक्क्यांवर
● पुन्हा लॉकडाऊन नको; गावागावात गुंज
● लसीकरण मोठ्या प्रमाणात तरीही लाटाप्रिय लोकांकडून भीती
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील 33 लाखांहून अधिक जणांनी लसीकरण केले आहे. शासकीय कार्यालयात दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश दिला जातो. मात्र, असे असताना गेल्या दोन दिवसांपासून वाढत चाललेली बाधित वाढ पाहून लाटाप्रिय लोकांकडून उगाच भीती निर्माण केली जात आहे. पुन्हा लॉकडाऊन नकोच अशी गावागावात गुंज सध्या सुरू आहे. नव्याने जिल्ह्यातील 65 जण बाधित आढळून आले आहेत. शनिवारी दिवसभरात 2776 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून पॉझिटिव्हीटी रेट 2.34 टक्क्यांवर आला आहे.
लाटाप्रिय लोकांना वेध तर सामान्यांना हवीय मोकळीक
गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या नावाने सर्व व्यवहार बंद, व्यवसाय बंद, माणसांचे एकमेकांत उठणे-बसणे बंद केले. त्यामुळे सुरुवातीला मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन जाहीर केले होते. त्यावेळी परिस्थिती कोरोना महामारीबाबत काहीच माहीत नव्हते. मात्र, झालेल्या लॉकडाऊनमुळे जसे फायदे झाले तसे तोटेही झाले. लॉकडाऊन सातत्याने होत असल्याने लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न पुन्हा पुन्हा उदभवू लागला. सध्या दुसरी लाट पूर्णपणे ओसरल्यावर नवीन वर्षात राज्यासह जिल्ह्यातील वाढती रुग्ण वाढ पाहून लाटाप्रिय लोकांना आनंदाचे भरते येऊ लागले आहे. तर दुसऱ्या बाजूला कष्टकरी वर्गाची इच्छा लॉकडाउन होऊ नये अशी आहे. लॉकडाऊन झाल्यास खायचं काय?,करायचं काय असा प्रश्न पडू लागला आहे. निर्बंध कडक केले तरीही व्यवसाय करता येणार नाही ही अडचण बनणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन नको अशीच गुंज सध्या गावागावात सूरु आहे.
लसीकरण मोठ्या प्रमाणावर तरीही भीती
जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 10 टक्के लोक लसीकरण करण्याचे राहिलेले आहेत. हे राहिलेले 18 वयाच्या खालचे असून त्यांचे लसीकरण लवकरच प्रशासन करणार आहे. सुमारे 32 लाखाच्या आसपास लसीकरण झालेले असून विनाकारण बाधित वाढ झाल्याने लाटाप्रिय व्यक्तीकडून भीती निर्माण केली जात आहे.
रविवारी
नमुने-2776
बाधित-65
रविवारपर्यंत
नमुने-23,75,624
बाधित-2,52,579
मृत्यू-6,498
मुक्त-2,45,009









