अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 14 मे, सकाळी 11.00
● कोविशिल्डचा दुसरा डोस लांबणीवर ● लस तुटवड्याने चिंता ●ऑक्सिजन चळवळ जिल्ह्याबाहेर ● रमजान साधेपणाने
सातारा / प्रतिनिधी :
शिवजयंती, रमजान ईद, महात्मा बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया हे सण, उत्सव साजरे साधेपणाने साजरे होत असतानाच अपवाद वगळता जिल्हावासियांनी घराबाहेर न पडता प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे दोन दिवसात दिसून आले. सण, उत्सवांवर मर्यादा येण्याचे हे सलग दुसरे वर्ष असून अपवाद वगळता लाखो जिल्हावासियांनी जबाबदारीचे दर्शन घडवले. जिल्ह्यात लॉकडाऊनचा दुसरा सप्ताह सुरू असून कोरोना रूग्णवाढीचा दोन हजारांच्या आसपास स्थिर आकडा कमी होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात रूग्णांची वाढ झाली आहे. या वाढीने जिल्ह्यातील एकूण रूग्णवाढीचा आकडा 2110 वर पोहचला आहे.
लसीच्या तुटवड्याने अनेकांना चिंता
जिल्ह्यात लसीकरणाचे नियोजन अजुनही आवश्यक त्या प्रमाणात होत नसल्याने नागरिकांच्यात नाराजीचा सुर आहे. कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस घेण्याची वेळ 8 ते 12 आठवड्यावरून 12 ते 16 आठवड्यांवर आल्याने ही लस वेळेत मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र तरीही लसीचा साठा कमी प्रमाणात येत असल्याने प्रत्येक केंद्रावर टोकण पद्धतीचा अवलंब सक्तीचा करावा अशी मागणी होत आहे. कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या हजारो नागरिकांना दुसरा डोस घेण्याची वेळ संपत आली तरीही दुसरा डोस मिळेना झाला आहे. त्यामुळे कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांची चिंता आता वाढू लागली आहे. यावरही प्रशासनाने स्पष्टीकरण देऊन दिलासा देण्याची गरज आहे.
ऑक्सिजन चळवळ जिल्ह्याबाहेरही
जिल्ह्यातील 81 टक्के कोरोना रूग्ण हे घरीच उपचार घेत आहेत. यातील अनेक रूग्णांना ऑक्सीजनची गरज भासते. सातारा, कराड, फलटण, वाईसह अनेक शहरात, गावात सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळांनी एकत्रित येत ऑक्सीजन मशीन खरेदी करून त्या मोफत वापरास देण्यास गेल्या वर्षीपासून सुरूवात केली आहे. एप्रिल महिन्यात रूग्णवाढ सुरू झाल्यानंतर या ऑक्सीजन चळवळीला पुन्हा वेग आला असून जिल्ह्यासह शेजारच्या सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातही प्रसंगी ऑक्सीजन मशीन पोहचवले जात आहे. ऑक्सीजन चळवळ राबवत असलेल्या सामाजिक संस्था, ग्रुप, सार्वजनिक मंडळे, वॉटसअप ग्रुप यांचे योगदान सध्या रूग्णांसाठी महत्त्वाचे ठरत आहे.
गुरूवारी जिल्ह्यात एकूण बाधित 2110एकूण मुक्त 827एकूण बळी 51
गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमुने -615461एकूण बाधित -131,199 घरी सोडलेले -133309 मृत्यू -3031 उपचारार्थ रुग्ण-28275









