951 जणांची माघार: 4338 उमेदवार रिंगणात
प्रतिनिधी / रत्नागिरी
जिह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 951 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 4338 उमेदवार रिगणात आहेत. दरम्यान, आता 15 जानेवारीला 360 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. खेड तालुक्यात सर्वाधिक 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
चिपळूण
चिपळूण तालुक्यात एकूण 189 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 260 प्रभागांपैकी 148 प्रभागात होत असलेल्या निवडणुकीसाठी एकूण 674 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया रात्री पूर्णत्वास गेल्यानंतर एकूण 22 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे मंगळवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.
रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यात गावागावांमध्ये जोरदार शह-काटशह देण्याची राजकीय मोर्चेबांधणी झालेली आहे. रत्नागिरी तालुक्यात निवडणूक होत असलेल्या 53 पैकी 42 ग्रामपंचायतींमधील निवडणुकीच्या आखाडÎातून 173 उमेदवारांनी जरी माघार घेतली तरीही 712 उमेदवारांमध्ये अस्तित्वाच्या लढाईसाठी चुरस रंगणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मोठी पडझड झालेल्या भाजपाला आटापिटा करावा लागत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पॅनलचे उमेदवार रिंगणात उभे केलेले आहेत. त्यामुळे तालुक्यात जोरदार राजकीय चुरस पणाला लागणार असल्याचे चित्र आहे.
संगमेश्वर
सोमवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी संगमेश्वर तालुक्यातील 81 ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. 349 जागांकरिता तब्बल 729 उमेदवार रिंगणात आहेत. 161 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. याबरोबरच 19 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 36 प्रभागातून 298 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता 62 ग्रामपंचायतीत थेट निवडणूक होणार आहेत.
लांजा
जानेवारीमध्ये होणाऱया लांजा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. यामध्ये 42 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून केवळ चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 19 ग्रामपंचायती निवडणुकीला प्रत्यक्ष सामोरे जाणार आहेत.
राजापूर
राजापूर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतींसाठी 78 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील 9 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्या असून उर्वरित ग्रामपंचायतीतील 136 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता 42 ग्रामपंचायतींमधील 559 उमेदवार रिंगणात आहेत.
गुहागर
तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 46 उमेदवारांनी माघार घेतल्याने 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर 16 ग्रामपंचायतींच्या 89 जागांसाठी 179 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. उमेदवारी अर्ज भरताना 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या, परंतु अर्ज माघारी घेताना आणखी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने एकूण 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
खेड
तालुक्यातील 87 ग्रामपंचायतींच्या 681 जागांसाठी दाखल झालेल्या 1182 उमेदवारांपैकी 667 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 87 पैकी 23 ग्रामपंचायतीतील 330 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 64 ग्रामपंचायतींसाठी 685 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 87 ग्रामपंचायतीसाठी 1190 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यातील 8 अर्ज अवैध ठरले होते. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे साऱयांचे लक्ष लागले होते. 87 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या.
दापोली
दापोली तालुक्यातील एकूण 57 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. सोमवारी 158 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. 42 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 459 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
मंडणगड
तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 37 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 125 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. दोन ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरित 13 ग्रामपंचायतीमध्ये 49 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे आता 13 ग्रामंपचायतीमधील एकूण 30 प्रभागांतील 61 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
| तालुका | निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती | बिनविरोध ग्रा.पं. | कितीजणांची माघार | मतदान होत असलेल्या ग्रामपंचायती | कितीजण रिंगणात |
| मंडणगड | 15 | 2 | 37 | 13 | 125 |
| दापोली | 57 | 15 | 158 | 42 | 459 |
| खेड | 87 | 23 | 667 | 64 | 685 |
| चिपळूण | 83 | 22 | 189 | 61 | 674 |
| गुहागर | 29 | 13 | 46 | 16 | 179 |
| संगमेश्वर | 81 | 19 | 161 | 62 | 729 |
| रत्नागिरी | 53 | 12 | 173 | 41 | 712 |
| लांजा | 23 | 4 | 42 | 19 | 216 |
| राजापूर | 51 | 9 | 78 | 42 | 559 |
| एकूण | 479 | 119 | 951 | 360 | 4338 |









