अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 20 मार्च 2022, सकाळी 11.00
● 374 जणांची स्वॅब तपासणी
● पॉझिटिव्हीटी 0.80
● सक्रिय रुग्ण मोजकेच
● यात्रा, जत्रा, कार्यक्रमांना येऊ लागली रंगत
सातारा / प्रतिनिधी :
जिल्हा कोरोनामुक्त झालेला आहे. दररोज नव्याने बाधित आढळून येणारे रुग्ण हे 3 च्या आत आहेत. एकाच तालुक्यात बाधित आढळून येत असून, सातारा तालुका प्रशासन संपूर्ण तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रविवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात 374 जणांची स्वॅब तपासणी केली तर नव्याने बाधित 3 जण आढळून आले असून, जिल्ह्याची पॉझिटिव्हीटी 0.80 वर आहे.
सक्रिय रुग्ण मोजकेच
जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 10 तालुक्यात नव्याने बाधित शून्य आढळून आलेले आहेत. फक्त सातारा तालुक्यातील नव्याने 3 जण बाधित आढळून आले आहेत. जे बाधित नव्याने आढळून येत आहेत. त्यातील सक्रिय रुग्ण मोजकेच आहेत. त्यांच्यावर चांगले उपचार घेतले जात आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तसेच मुक्त होणाऱ्यांची संख्या नव्याने बाधित आढळून येणाऱ्या पेक्षा चांगली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शून्य पहायला मिळेल असे चित्र स्पष्ट होत आहे.
मार्च महिना जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा
जिल्ह्यातील बाधित वाढ जानेवारी महिन्यात वाढली होती. चिंतेचा विषय बनला होता. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला या बाधित वाढीचा वेग मंदावू लागला. अगदी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून 15 मार्चपर्यंत जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत कोरोनामुक्त झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने मार्च महिना महत्वाचा दिलासा देणारा ठरला आहे. जिल्ह्यात गावोगावी यात्रा, जत्रा, उत्सव, कार्यक्रम दोन वर्षाच्या कालावधीनंतर उत्साहात साजरे होताना दिसत आहे.
रविवारी
नमुने-374
बाधित-3
रविवारपर्यंत
नमुने-25662377
बाधित-2,79,165
मृत्यू-8862
मुक्त-2,71,753









