ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. 9 डिसेंबरला कंपाला युगांडा येथून फलटणमध्ये आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांपैकी तिघांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.
कंपाला युगांडा येथून एकाच कुटुंबातील चार व्यक्ती 9 डिसेंबरला लक्ष्मीनगर फलटण येथे आल्या होत्या. आरोग्य विभागास याची माहिती मिळाल्यानंतर त्यांची तपासणी व आरटीपीसीआर टेस्ट 13 डिसेंबरला करण्यात आली. यामध्ये तीन जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर या कुटुंबाचे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामधून तिघांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याची पुष्टी झाली. तर एक जण कोरोना पॉझिटिव्ह आहे.
या कुटुंबाचे उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे विशेष कक्षामध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. या चारही व्यक्तींची प्रकृती ठिक आहे. तसेच निकट सहवासितांचे अहवाल कोव्हीड 19 साठी निगेटिव्ह आले आहेत.









