प्रतिनिधी / सांगली
सोमवारी जिल्हय़ात १५ नवीन रूग्ण वाढले. यामध्ये पाच रूग्ण मिरज शहरात, मणदूर येथे तीन, तर बिळूर येथे दोन वाढले. सांगली, शिपूर-व्यंकोजीवाडी, शिंदेवाडी, नेलकरंजी, अमनापूर येथे प्रत्येकी एक रूग्ण वाढला. एकूण रूग्णसंख्या ५१९ झाली आहे. तर सोमवारी एकही रूग्ण कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे उपचारातील रूग्णसंख्या २१९ इतकी आहे.
मिरज शहरातील त्या दवाखान्यांशी संपर्क आलेले रूग्ण वाढले
मिरज शहरातील एका खासगी दवाखान्यात एक कोरोना रूग्ण होता. त्या हॉस्पिटलला तातडीने सील केले आहे. पण, या दवाखान्यात असणाऱ्या दोन व्यक्तीला आणि दोन रूग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात रूग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. मिरज शहरात भारतनगर येथे ७२ वर्षीय व्यक्ती, अमननगर येथील ५२ वर्षीय व्यक्ती, रेवनी गल्ली येथील ४० वर्षीय महिला, वाळवे गल्ली येथील ५० वर्षीय महिला, सुंदरनगर येथे ७८ वर्षीय व्यक्ती असे पाच जण बाधित आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कातील हायरिस्क असणाऱया व्यक्तींना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मणदूर आणि बिळूर येथील रूग्णसंख्या वाढतच चालली आहे
जिल्हय़ातील कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या जत तालुक्यातील बिळूर आणि शिराळा तालुक्यातील मणदूर या दोन्ही गावांत रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. सोमवारी मणूदर येथे तीन रूग्ण वाढले त्यामध्ये २६, ६० आणि ६१ वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे. तर जत तालुक्याती बिळूर येथे दोन रूग्ण वाढले त्यामध्ये ४० आणि ४४ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
सांगली, शिपूर, शिंदेवाडी, नेलकरंजी, अमणापूर येथे रूग्ण वाढले
सांगली शहरातील रमामाता नगर येथील माने गल्लीमधील ४४ वर्षीय व्यक्ती, मिरज तालुक्यातील व्यंकोजीवाडी-शिपूर येथील ७३ वर्षीय व्यक्ती, शिंदेवाडी येथील ५० वर्षीय व्यक्ती, आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी येथील ४५ वर्षीय महिला, पलूस तालुक्यातील अमनापुर येथील २० वर्षीय महिला हे सर्वजण बाधित आढळून आले आहेत. त्यांच्यावर मिरजेच्या कोरोना रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
नऊ जणांची प्रकृती चिंताजनक
सध्या उपचारात असणाऱ्या रूग्णांपैकी जत तालुक्यातील बिळूर येथील ७५ वर्षीय व्यक्ती, मिरज तालुक्यातील बुधगाव येथील ७५ वर्षीय व्यक्ती, कानकात्रेवाडी येथील ४८ वर्षीय व्यक्ती, नेलकरंजी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, सांगली-जुना बुधगाव रोडवरील ६५ वर्षीय व्यक्ती, सांगली येथील ७८ वर्षीय महिला, पलूस तालुक्यातील बह्मनाळ येथील ४० वर्षीय व्यक्ती अशा सात जणांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर परजिल्हय़ातील दोन रूग्णांच्यावरही अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण ५१९
बरे झालेले २७७
उपचारात २२९
मयत १३








